धारणीतील बहुतांश शाळांना शिवजयंतीचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:34 PM2018-02-20T23:34:19+5:302018-02-20T23:34:36+5:30
राष्ट्रीय पातळीवरील महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी जि.प. शाळेत साजरी करण्याचे नियम असताना, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी बहुतांश शाळांतील मुख्याध्यापकांनी ‘सुटी’चा आनंद घेतला.
आॅनलाईन लोकमत
धारणी : राष्ट्रीय पातळीवरील महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी जि.प. शाळेत साजरी करण्याचे नियम असताना, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी बहुतांश शाळांतील मुख्याध्यापकांनी ‘सुटी’चा आनंद घेतला. त्यामुळे महापुरुषांच्या कर्तबगारीचा बोध घेण्यापासून विद्यार्थी वंचित राहिलेत. शासकीय नियमांची पायमल्ली करणाºया अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीबाबत सोमवारी जि.प. शाळांतील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने तालुक्यातील धोदरा, सावºया, पाथरपूर, खारी या गावांना भेट दिली. येथे मुख्याध्यापकांसह शिक्षकांनीही दांडी मारल्याचे निदर्शनास आले. यापैकी खारी येथील जि.प. उच्च माध्यमिक शाळेत शिक्षकांनी शनिवारीच शाळेच्या दर्शनी भागात लावलेल्या सूचना फलकावर जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांबद्दल माहिती लिहून ठेवले होते. मात्र, शाळेत एकही शिक्षक आले नसल्याचे समजले.
धोदरा, सावºया व पाथरपूर येथील जि. प. मराठी शाळेत सूचना फलक कोरे होते. विशेष म्हणजे, धोदरा शाळेतील सूचना फलकावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहिल्याचे दिसून आले. या शाळेतील काही विद्यार्थी शाळा परिसरात मिळून आले. त्यांना आपल्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांचेच नाव माहीत नसल्याची धक्कादायक बाब त्यांच्याशी संवाद साधताना अनुभवास आली.
मी शिवजयंतीबाबत माहिती व्हॉट्सअॅपवर घेत आहे. धोदरा, सावºया, पाथरपूर व खारी शाळेची माहिती अप्राप्त आहे. कार्यक्रम न घेतल्याचे समजल्यास कारवाई करण्यात येईल.
- मो. युनूस इस्माईल
गटशिक्षणाधिकारी, धारणी