बहुतांश शाळांत आरक्षण प्रवेशाचे फलक नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 12:17 AM2016-04-24T00:17:50+5:302016-04-24T00:17:50+5:30
शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. परंतु काही शिक्षण ...
शासन आदेशाला बगल : धनदांडग्यांना प्रवेशाची हमी
अचलपूर : शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. परंतु काही शिक्षण संस्था चालकांकडून या नियमांना बगल देण्यात येत आहे. दर्जेदार शाळांत गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले. परंतु शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अवघे आठ दिवस उरल्यावरही शाळांमध्ये प्रवेश आरक्षणाचे फलक लागले नाहीत.
शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. १ मे रोजी शाळांचे परीक्षेचे निकाल लागताच शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होणार आहे. आपल्या पाल्यंना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी धनदांडग्यांची धडपड सुरू आहे. गोरगरीब पालकही या शाळांपासून वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत बालकांचा मोफत शिक्षण हक्क कायदा २००५ नुसार आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शाळेच्या दर्शनी भागात ६ बाय ८ फूट आकाराचे फलक लावण्याचे व सर्व शाळांचे निकाल जाहीर झाल्याशिवाय प्रवेश न देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे. मात्र, तालुक्यातील शाळांनी या आदेशाला तिलांजली दिली आहे. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया ४ ते ५ दिवसांनी सुरू होण्याची शक्यता असली तरी या योजनेची माहिती पालकांना होऊ नये यासाठी बहुतांश शाळांत फलक लावलेले नाहीत. ज्या शाळेत फलक लागणार नाही त्या शाळांवर आरटीई कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या परिपत्रकातून सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)