आई-मुलाला सासरच्यांनी जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:38 AM2018-12-12T01:38:33+5:302018-12-12T01:40:54+5:30
तालुक्यातील नरसिंगपूर येथे विवाहितेचा चिमुकल्या मुलासह जळून मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून सासरच्या मंडळीने तिला मुलासह जाळून मारल्याची तक्रार विवाहितेच्या वडिलांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील नरसिंगपूर येथे विवाहितेचा चिमुकल्या मुलासह जळून मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून सासरच्या मंडळीने तिला मुलासह जाळून मारल्याची तक्रार विवाहितेच्या वडिलांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सारिका प्रवीण बायस्कर (२५) व विघ्नेश प्रवीण बायस्कर असे मृताचे नाव आहे. नरसिंगपूर येथे राहत्या घरी शुक्रवारी सकाळी ५ च्या सुमारास एका खोलीत या मायलेकांनी शुक्रवारी जाळून घेतल्याची घटना घडली. या घटनेच्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले. मृतक सारिका व तिच्या मुलाला नागपूर येथे खाजगी रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र आई व मुलगा हा जास्त प्रमाणात जळल्यामुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला.
चांदुरबाजार तालुक्यातील जसापूर बंड येथील सारीकाचा विवाह नरसिंगपूर येथे प्रवीण नामदेव बायस्कर यांच्यासोबत पाच वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर कुटुंबामध्ये सर्व काही व्यवस्थित असताना अचानक कुठेतरी घरामध्ये वाद निर्माण झाला. यातूनच सासरच्यांनी आई व मुलाचा जाळून मारल्याचा आरोप सारीकाच्या वडिलांनी केला आहे. सासरच्यांनी वारंवार माहेरचा मंडळीकडून पैशाची मागणी करत होते. पण ती मागणी काही वेळा पूर्ण सुद्धा करण्यात आली. मात्र त्यांची मागणी आणखी वाढतच होती. ती पूर्ण न केल्यामुळे अखेर माझ्या मुलीला व नातू विघ्नेश याला जावाई वारंवार मारहाण करीत होते, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे. जाळून घ्यायच्या अगोदर शुक्रवार रोजी सकाळी पाचच्या दरम्यान तिचे वडील दिवाकर देविदास बंड यांना त्यांची मुलगी सारिका हिचा फोन आला व त्याच दिवशी तिला तिच्या पती प्रवीण बायस्कर, त्यांचे मोठे भाऊ राजेश बायस्कर व त्याची पत्नी स्वाती राजेश बायस्कर यांनी सारिका व तिचा मुलगा विघ्नेश यांच्यावर रॉकेल टाकून त्यांना जाळून टाकले, असा आरोप मुलीचे वडील दिवाकर देविदास बंड त्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला मंगळवारी तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन दर्यापूर पोलिसांनी प्रवीण बायस्कर व त्यांचे मोठे भाऊ राजेश बायस्कर व त्याची पत्नी स्वाती राजेश बायस्कर यांच्याविरुद्ध कलम ३९८ अ, ३०४ ब, ३४ भादविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.