दिवाळीच्या दिवशी अमरावतीत माय-लेकीची आत्महत्या; मुख्याध्यापक पतीला अटक
By प्रदीप भाकरे | Published: October 26, 2022 05:07 PM2022-10-26T17:07:59+5:302022-10-26T17:13:24+5:30
बंद घरात आढळले माय-लेकीचे मृतदेह
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक सन्मती कॉलनीतील एका बंद घरात माय-लेकीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुवर्णा प्रदीप वानखडे (५५) व मृणाल प्रदीप वानखडे (२४) अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. उच्चभ्रू कुटुंबातील माय-लेकीच्या आत्मघाताप्रकरणी प्रदीप रंगराव वानखडे (५७) याच्याविरुद्ध काैटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गु्न्हा दाखल करून बुधवारी त्याला अटक करण्यात आली. दिवाळीच्या रात्री दोघींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज गाडगेनगर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इंद्रप्रस्थ कॉलनी येथील एका मंदिराजवळ एका व्यक्तीला सोने व रोख रक्कम असलेली एक बॅग आढळून आली. त्याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने तेथे पोहोचले. त्यात काही बिल, १.७५ लाख रोख व सोन्याचे १५० ग्रॅम दागिने आढळून आले. पटेलनगर येथील विजय अण्णाजी आखरे (६५) यांचा संदर्भ त्यातून मिळाला. पोलिसांनी मंगळवारी रात्री ८.४५ च्या सुमारास आखरे यांच्याशी संपर्क साधून प्रदीप वानखडे यांच्या नावाचे सोने व रोख एका मंदिराजवळ आढळल्याची माहिती दिली. आखरे हे गाडगेनगर ठाण्यात पोहोचले. तेथून आखरे यांनी बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही, तर जावई प्रदीप वानखडे हे शेगावला असल्याची माहिती मिळाली.
रात्री १० ते १०.३० च्या सुमारास ठाणेदार आसाराम चोरमले हे आखरे यांच्यासह प्रदीप वानखडे यांच्या शिक्षक सन्मती कॉलनी येथील घरी पोहोचले. त्यावेळी दार आतून बंद होते. पोलिसांनी मागच्या बाजूचे दार तोडले असता, आतील दृश्य भयावह होते. सुवर्णा व मृणाल या माय-लेकी हॉलमधील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतावस्थेत होत्या. सुमारे १२ ते १४ तासांपूर्वीची ती घटना असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. घरात लक्ष्मीपूजनाची तयारी अर्धवट होती. किचनमध्ये स्वयंपाकदेखील करण्यात आला होता. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी सायंकाळी नेमके असे काय झाले, की त्यातून उच्चविद्याविभूषित असलेल्या माय-लेकींनी आत्मघाताचा निर्णय घेऊन तो तडकाफडकी अंमलात आणला, हे तूर्तास अनुत्तरित आहे.
सुसाईड नोट मिळाली
सुवर्णा व मृणाल यांनी ज्या हॉलमध्ये आत्महत्या केली, त्या हॉलमधील टी-टेबलवर ५०० रुपयांच्या नोटांमध्ये एक सुसाईड नोट आढळून आली. पुण्यातील बड्या कंपनीसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनिअर मृणाल हिने ‘माझ्या बाबाला आम्ही नको आहे. आता बस झाला त्रास’ असे लिहून आत्महत्या केली. पोलिसांनी ती नोट जप्त केली आहे.
जावयाने केले प्रवृत्त
जावई प्रदीप हा घाटंजी तालुक्यातील एका गावात खासगी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक आहे. त्याच्या त्रासामुळेच बहीण व भाचीने आत्महत्या केल्याची तक्रार सुवर्णाचे भाऊ विजय आखरे यांनी मंगळवारी उशिरा रात्री गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्या तक्रारीवरून शेगावहून परतताच प्रदीप वानखडे याला बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. वानखडे हे पती व मुलीपासून दूर यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात राहत होते. ते दिवाळीच्या दिवशी दुपारपर्यंत अमरावतीत असल्याची माहिती समोर आली आहे.