शेततळ्यात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 08:03 PM2019-06-17T20:03:14+5:302019-06-17T20:21:07+5:30
घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे कमल बापू पानसरे (वय -३६) व मुलगी वर्षा बापू पानसरे (वय- १६) या मायलेकींचा ...
घारगाव : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे कमल बापू पानसरे (वय -३६) व मुलगी वर्षा बापू पानसरे (वय- १६) या मायलेकींचा दुपारी चार वाजता शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
कमल बापू पानसरे या गुरांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यात दोरीच्या साहाय्याने हंडा घेऊन उतरल्या असताना अचानक दोर तुटला व त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून मुलगी वर्षा पानसरे या पाण्यात पडल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघींचाही बुडुन मृत्यू झाला.
सध्या दुष्काळाचे सावट आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेततळी हा एकमेव आधार आहे. दुष्काळाचे सावट व पाणीटंचाई ने मायलेकींचा दुर्दैवी अंत झाला. वर्षा पानसरे हिने एसएससी ची परीक्षा ७८% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी श्रीगोंदा येथे पाठवले आहेत. त्यांच्या मृत्यूने घारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
जिल्ह्यातील ही तिसरी घटना असून घुमरी गावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुली आणि आई यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या दिवशीच दुदेर्वी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.