रुक्मिणीमातेने विदर्भातील इतर दिंड्यांना घ्यावे पदरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:27+5:302021-07-01T04:10:27+5:30
समन्वयातून मार्ग काढला तर विदर्भातून ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो गणेश महाराज शेटे, पंढरीची आस, ऐतिहासिक होऊ शकतो सोहळा तिवसा ...
समन्वयातून मार्ग काढला तर विदर्भातून ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो
गणेश महाराज शेटे, पंढरीची आस, ऐतिहासिक होऊ शकतो सोहळा
तिवसा : तालुक्यातील कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानची विश्वस्त मंडळी, पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासन या सर्वांच्या समन्वयातून आणि वारकरी संघटनांना विश्वासात घेऊन जर आई रुक्मिणीमातेच्या पालखी सोहळ्यासोबत इतरही दिंड्यांना स्थान दिले, तर यंदाची आषाढी वारी ही ऐतिहासिक सोहळा होऊ शकतो, असे मत विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी व्यक्त केले.
आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातून मानाच्या फक्त दहा पालख्या वाहनांनी जाणार आहेत. त्यामध्ये विदर्भातून कौंडण्यापूर येथील रुक्मिणीमातेच्या पालखीचा समावेश आहे. पण, विदर्भामधून इतरही काही गावांतून शेकडो वर्षांची पालखी परंपरा जोपासली जात आहे. म्हणून इतरही दिंड्यांना वाहनाने आषाढी वारीमध्ये सहभागी होता यावे, याकरिता विश्व वारकरी सेनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विनंती करून प्रशासकीय बैठक लावण्यात आली होती. रुक्मिणीमातेच्या पालखीसोबत इतर प्रत्येक दिंडीतील किमान एक वारकरी वीणेकरी स्वरूपात सहभागी करून घ्यावा, ही विनंती करण्यात आली होती. वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर, विठ्ठल रुक्मिणी संस्थान, जिल्हाधिकारी यांना याबाबत स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे. यात कौंडण्यपुरातील पालखीचे २० वारकरी, किमान १५ दिंड्यांचे प्रत्येकी एक असे वीणेकरी स्वरूपात १५ प्रतिनिधी आणि पाच वारकरी संघटनांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी असे एकूण ४० वारकरी आषाढी वारीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. विश्व वारकरी सेनेच्यावतीने केलेली ही विनंती मान्य करण्यात यावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे.