आई म्हणाली, तासनतास मोबाईलवर बोलत राहते, मुलगी परांगदा!
By प्रदीप भाकरे | Published: July 11, 2023 12:51 PM2023-07-11T12:51:59+5:302023-07-11T13:04:56+5:30
मोबाईलसाठी हटकले : तीन दिवसांपासून निव्वळ शोध
अमरावती : अलिकडे टिनएजर मुलामुलींचा स्क्रिनटाईम भलतच वाढला आहे. अन्य सोशल मिडियाच्या तुलनेत इन्स्टावर तासनतास घालवले जातात. पालक बोलले की त्या पाल्यांचे गाल फुगतात. मोाबईलसाठी हटकल्याने घर सोडून जाणारेही कमी नाहीत. टिनएजर मुलेमुली घरातून पळून जातात, त्यामागे मोबाईल व त्यावरील सोशल मिडियाचा अतिरेक सर्वाधिक कारणीभूत ठरला आहे. अशी एक घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. मोबाईलवरून आई बोलल्याने एका अल्पवयीन मुलीने घर सोडले.
त्याचे झाले असे की, मोबाईलवर बोलत असल्याने तिच्या आईने तिला रागावले. परिणामी ती मुलगी रागात घर सोडून गेली. बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलै रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ९ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार ती मुलगी तिच्या आईला ७ जुलै रोजी सायंकाळी एका मुलासोबत फिरताना दिसली. त्यामुळे तिच्यावर तिची आई रागावली. त्यानंतर ८ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ती फोनवर बोलत असल्याने तिची आई पुन्हा रागावली. एवढ्या रात्रीपर्यंत फोनवर राहते, सकाळी उठत नाही. अशा शब्दात तिची खरडपट्टी काढली. त्यामुळे एका तासाने सकाळी ६.३० च्या सुमारास ती रागारागाने घराबाहेर निघून गेली. तिची शोध घेण्यात आला. मात्र ती आढळून न आल्याने बडनेरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिचा शोध चालविला आहे. पालकांकडूनही शोधाशोध सुरू आहे.
मुले मुली पळून जाण्याची कारणे
मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. वडील पैसा कमविण्यात; तर आई घरकामात वा नोकरीत गुंतलेली असते. वयात येत असताना मुलांच्या हाती स्मार्टफोन देण्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर पडतो. मैत्रिणींना असलेला बॉयफ्रेंड आपल्यालाही असावा, असे विचार मनात येणे स्वाभाविक आहे. घरात कुणी वेळ देत नाही; म्हणून ती बाहेर कोणी वेळ देणारा शोधत असते. त्यातून मुली नको त्या वयात प्रेम नावाच्या जाळ्यात अडकतात. सोशल मीडियाचा अतिवापर मुले पळून जाण्यास कारणीभूत ठरत आहे.