मुलीसाठी आईची वणवण
By admin | Published: April 19, 2017 12:13 AM2017-04-19T00:13:27+5:302017-04-19T00:13:27+5:30
मनोरूग्ण मुलीला घरमालकाने जबरदस्तीने घरात ठेवून घेतले असून माझी मुलगी मला परत मिळावी, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे.
आरोप : पोलिसांबद्दल रोष
अमरावती : मनोरूग्ण मुलीला घरमालकाने जबरदस्तीने घरात ठेवून घेतले असून माझी मुलगी मला परत मिळावी, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. याबाबत आपण बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविण्यास गेले असता तक्रार घेण्यात आली नाही, असेही या मातेचे म्हणणे आहे.
माया राजेश्वर रोडे, असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. मतिमंद मुलीवर उपचार करण्यासाठी सदर महिला मुलगी नीता रोडे हिच्यासह काही दिवस बडनेरातील मीरा दातार दर्ग्यामध्ये वास्तव्यास होती. त्यानंतर तिने मिलचाळ परिसरातील मनू जोसेफ मोरे नामक इसमाकडे खोली भाड्याने घेतली. फक्त १५ दिवस तेथे राहत असताना मनू मोरे याने जबरदस्तीने मुलगी नीता हिला स्वत:च्या घरात ठेवून घेतले आहे. आता तो तिला सोडण्यास नकार देत आहे.
महिलेच्या मते मुलगी मतिमंद असल्याने ती स्वत:च्या आयुष्याचा निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यामुळे मुलगी परत मिळावी, यासाठी त्यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे यात पोलिसांची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. वरिष्ठांनी याप्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुलगी परत मिळवून द्यावी, अशी मागणी माया राजेश्वर रोडे या महिलेने केली आहे.
(प्रतिनिधी)
महिलेची मुलगी सज्ञान असल्याने तिने मनू मोरेसोबत विवाह केला आहे. पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याने आईच्या तक्रारीच्या अनुषंगाने काही कारवाई करता येणार नाही.
- दिलीप पाटील, ठाणेदार, बडनेरा