मेळघाटात पुन्हा ‘माता मृत्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 12:24 AM2016-11-09T00:24:12+5:302016-11-09T00:24:12+5:30

कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार वृत्तीचा फटका गर्भवती महिलांसह मातांना बसत आहे.

'Mother's death' again in Melghat | मेळघाटात पुन्हा ‘माता मृत्यू’

मेळघाटात पुन्हा ‘माता मृत्यू’

Next

आरोग्य यंत्रणेचे अपयश : घरीच झाली प्रसूती
नरेंद्र जावरे परतवाडा
कुपोषणाचा कलंक लागलेल्या मेळघाटात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार वृत्तीचा फटका गर्भवती महिलांसह मातांना बसत आहे. चिखलदरा तालुक्याच्या भंडोरा येथील एका आदिवासी मातेला सोमवारी प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांत जीव गमवावा लागल्याची घटना चुरणी ग्रामीण रुग्णालयात उघडकीस आली आहे.
हिरू रोणा भुसूम (२८, भंडोरा) असे मृत मातेचे नाव आहे. सोमवार ७ नोव्हेंबरला हिरू गर्भवती असल्याने तिला वेळेपूर्वीच प्रसूतीची कळा येऊ लागल्या, असह्य वेदना सहन करीत घरीच सकाळी १० वाजता प्रसुती झाली. मात्र प्रसुतीनंतर बाळ आणि आईची ‘नाळ’ योग्यरितीने तोडल्या गेली नाही. परिणामी सदर महिलेची प्रकृती खालावली. तिला चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तिथे हिरू भुसूम या महिलेने दुपारी १ वाजता अखेरचा श्वास घेतला.
मरणयातना देणारे रुग्णालय
मेळघाटात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. पावसाळ्यात तज्ज्ञ व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे कुपोषित बालकांच्या मृत्यूचा आकडा फुगला. तेथे कधी नव्हे त्या प्रमाणात मातामृत्यूच्या आकड्यात वाढ झाली. चुरणी ग्रामीण रुग्णालय नाममात्र ठरले आहे. सर्दी, खोकला, तापाचे सामान्य रुग्ण येथून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याची परंपरा कायम आहे. डॉक्टर आहे तर औषध नाही आणि औषध असेल तर आवश्यक त्या रुग्णांसाठी नाही, असा खेळ आता आदिवासींनाही पाठ झाला आहे.
वेळेपूर्वीच प्रसूतीतज्ञ झोपेत
आदिवासी गर्भवती महिलेची गर्भधारणा होताच शासनातर्फे विविध योजनांची खिरापत दिली जाते. मात्र त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात किती गर्भवती मातांना दिला जातो, हे मात्र आरोग्य यंत्रणेलाच माहीत आहे. साधारणत: थेट प्रसूतीची तारीख आणि महिना सांगण्यात येतो. अशात भंडोरा येथील हिरू भुसूम या मातेला सांगण्यात आले. परंतु तिची प्रसूती साडेसात महिन्यातच झाली. अशात तिची देखभाल करणारी प्रशासकीय यंत्रणा कुठे गेली होती आणि दुसरीकडे प्रसूती माहेरघरात करण्यात यावी, यासाठी पाहिजे त्या प्रमाणात सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात येते. तरीसुद्धा वेळेपूर्वी प्रसूती झाल्याने थेट एका मातेला आरोग्य यंत्रणेच्या समन्वयाअभावी जीव गमवावा लागला, हे येथे उल्लेखनीय.



मृतदेहाची फरफट
चुरणी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू पावलेल्या हिरू भुसूम यांचा मृतदेह घरी पाठविला आणि शवविच्छेदनासाठी पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अगोदर शवविच्छेदन न करता मृतदेह कसा पाठविण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

या महिलेची प्रसूती सकाळी १० वाजता घरी झाली. दुपारी १२ वाजता तिला चुरणी ग्रामीण रुग्णालयात आणले. नाळ योग्य पद्धतीने तुटली नाही आणि अतिरिक्त स्त्रावामुळे रेफर केले असताना मृत्यू झाला. मी अमरावती येथे कामानिमित्त गेले होते.
- विद्या वाठोडकर, वैद्यकीय अधीक्षक,
चुरणी ग्रामीण रुग्णालय.

Web Title: 'Mother's death' again in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.