मुलांच्या विरहात मातेचा आत्मघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:20 AM2018-05-01T00:20:49+5:302018-05-01T00:21:01+5:30
मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही हृदयद्रावक घटना रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारगाव येथे घडली. या दुर्दैवी मातेचा २८ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुवर्णा अमोल अडेकर (३२) असे मृताचे नाव आहे. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयानानुसार, सदर महिलेचा विवाह २००७ मध्ये अमोल अडेकार यांच्याशी झाला. त्यांचा सुखी संसार सुरू होता. त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्याकडेच राहत असलेली नणंद अंजली उमेकर हिने अमोलकडे सुवर्णाच्या कागाळ्या केल्या. त्यामुळे पती मारहाण करून शिवीगाळ करू लागला. चार वर्षांपूर्वी एके दिवशी पतीने सुवर्णाला आई-वडिलांकडे माहेरी आणून सोडले. तेव्हापासून पतीने तिला घरी नेले नाही, तर दोन मुलांनासुद्धा भेटू दिले नाही. २८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता सुवर्णाच्या माहेरी तिचे बाबा व भाऊ दोघेही झोपले होते, तर आई घराबाहेर गेली होती. घरात विचारमग्न अवस्थेत असलेल्या सुवर्णाला मुलांची आठवण येताच आपसूक डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. मुलांना बघण्याची, त्यांना माया देण्याची अतृप्तता मनात होती. मुलांपासून वंचित राहून आणखी किती दिवस जगायचे, काय करावे-काय नाही, या दुविधेत असलेल्या सुवर्णाने अखेर टोकाचा निर्णय घेत घरात ठेवलेली रॉकेलची डबकी स्वत:च्या अंगावर ओतली आणि माचीसने पेटवून घेतले. साडीने पेट घेतल्याने आगीचा विळखा घट्ट झाला. त्याची जाणीव होताच तिने आरडाओरड केली. वडील, भाऊ व शेजारी धावून आले आणि त्यांनी आग विझविली. भाजलेल्या सुवर्णाला आॅटोत टाकून जिल्हा सामान्य रुग्णलायात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुवर्णा ८८ टक्के भाजल्याचे स्पष्ट केले. तिच्यावर तत्काळ वार्ड क्रमांक ४ मध्ये उपचार सुरू करण्यात आला. मात्र, काही तासानंतरच तिची प्राणज्योत मालवली. तिने शहर कोतवाली पोलिसांना मृत्यूपूर्वी दिलेल्या बयाणात तिच्या जीवनातील हृदयद्रावक प्रसंग विशद केला.
कुणावर करणार पोलीस कारवाई?
सुवर्णाच्या पतीने तिला माहेरी आणून टाकले. मुलांना भेटण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे तिने मुलांच्या विरहात आत्महत्या केली. आता रहिमापूर पोलीस कुणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती येथील शहर कोतवाली ठाण्याकडून अद्याप डायरी प्राप्त झालेली नाही. संबंधित महिलेने दिलेल्या बयानाचे दस्तऐवज प्राप्त झाल्यावर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.
- सचिन सिरसाट,
ठाणेदार, रहिमापूर ठाणे.