आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पर्वत पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:19+5:302020-12-15T04:30:19+5:30
अमरावती : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अंतर्गत जिल्हा गिर्यारोहण संघटनेतर्फे छत्री तलाव ते बंदाराझिरा परिसरात पर्वत पूजन हा आगळावेगळा ...
अमरावती : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अंतर्गत जिल्हा गिर्यारोहण संघटनेतर्फे छत्री तलाव ते बंदाराझिरा परिसरात पर्वत पूजन हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. भारतीय संस्कृतीत गाेवर्धन पर्वत पूजनाची प्राचीन परंपरा आहे.
संयुक्त राष्ट्र महासंघाकडून दरवर्षी ११ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. त्यानुसार २००३ पासून संयुक्त राष्ट्र महासंघाकडून जगभरातील पर्वताचे मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण स्थान आणि त्याचे संवर्धन व्हावे, या हेतुने पर्वत पूजन कार्यक्रम घेण्यात येते. यामाध्यमातून पर्वतावरील जैवविविधता,
गिर्यारोहणाचे महत्त्व आणि मानव जातीसाठी पर्वताचे महत्त्व ओळखून गिर्याराेहण संघटनेच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष हेमंत थेटे, अविनाश असनारे, जयंत वडतकर, मंदा नांदुरकर, दीपक आत्राम, दिलीप चेपे, मनीषा पावगी, सुशील राऊत, किरण मोरे, यादव तरटे, आशिष अडवाणीकर, आकांक्षा असनारे, ओंकार थेटे, ईशान थेटे, कृष्ण पावगी आदी उपस्थित होते.
-------------------------
असे आहे पर्वताचे महत्त्व
जिल्ह्यात उत्तरेकडे सातपुड्याची पर्वतरांग, त्यामध्ये मेळघाटचे जंगल, गाविलगड डोंगर रांगा, सालबर्डी परिसरातील डोंगर, वरूडजवळील महेंद्रीचे जंगल आणि पोहरा- मालखेडच्या डोंगर रांगातील जंगल असा संपन्न वारसा आहे. या डोंगर रांगातून आणि पर्वतातून अनेक नद्यांचे उगम होत असून या नद्यांच्या पाण्यावर सिंचन प्रकल्प अवलंबून आहे. त्यातील पाण्यावर येथील शेती आणि मानवासाठी पाण्याची उपलब्धता होते. या डोंगर रांगात आणि पर्वतात वन्यजीवांना आश्रय देणारी जंगले असून, अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. याच पर्वतांवर साहस प्रेमी पदभ्रमण, गिर्यारोहण, रिव्हर क्रॉसिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅप्लिंग , क्लाइम्बिंग असे अनेक साहसी उपक्रम आयोजित करून नवीन पिढीला जंगल, वन्यजीवन व साहसाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा वारसा जतन करण्यासाठी या पर्वतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.