मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धा चेनस्नॅचरच्या ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 09:55 PM2018-06-05T21:55:22+5:302018-06-05T21:55:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मंगळवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्या. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत रपेट करणाऱ्या महिला या चेनस्नॅचरच्या ‘सावज’ बनल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून लक्षात येत आहे. त्यामुळे या महिलांनी फिरताना सतर्क राहणे आता गरजेचे झाले आहे.
राठीनगरातील रहिवासी पद्मा लक्ष्मीनारायण गांधी (७२) मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास परिसरात फिरत होत्या. त्या एका महिलेशी चर्चा करीत असताना दुचाकीने आलेल्या दोन तरुणांनी मुख्य रस्ता कुठे आहे, असे विचारले. पद्मा यांनी हाताने मुख्य रस्ता दाखविताच दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यावर हात टाकून मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांनीही तपासकार्य सुरू केले.
राठीनगरातील घटनेत तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन तरुणांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याचे सीसीटीव्हीत स्पष्टपणे पाहता येऊ शकते. कोतवाली व गाडगेनगर हद्दीत घडलेल्या या घटनांमध्ये दोन्ही आरोपी एकच असल्याचे निदर्शनास येत आहे. ही ईराणी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलीस तपासाची बतावणी करून दागिने लंपास
कलावती भगीरथ शर्मा (७०, रा. बच्छराज प्लॉट) सकाळी ६.४५ वाजता सतिधाम मंदिरातून बालाजी मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. रॉयली प्लॉट स्थित दवा बाजारासमोरून त्या जात असताना दोन अज्ञात इसमांनी आवाज दिला. समोर पोलीस चेकिंग करीत आहे; तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून आमच्याकडे द्या, अशी बतावणी त्यांनी केली. कलावती शर्मा यांनी गळ्यातील १५ ग्रॅ्रमचे दागिने काढून एका कागदी पुडीत ठेवले. पुडी पाहतो म्हणून इसमांनी ती हाती घेतली आणि पळ काढला. या घटनेची तक्रार कोतवाली पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.