बडनेऱ्यात रेल्वेचालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:57 PM2018-07-18T23:57:07+5:302018-07-18T23:57:30+5:30
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील वेतन भत्ता जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वेचालक, सहायक रेल्वेचालकांनी तब्बल ४८ तास निदर्शने केलीत. मात्र, कर्तव्य बजावून आंदोलनात उडी घेतल्याने प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील वेतन भत्ता जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वेचालक, सहायक रेल्वेचालकांनी तब्बल ४८ तास निदर्शने केलीत. मात्र, कर्तव्य बजावून आंदोलनात उडी घेतल्याने प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही, हे विशेष.
रेल्वेचालकांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी संपूर्ण देशभरात निदर्शने केली. यात बडनेरा, अकोला, नागपूर, भुसावळ येथील रेल्वेचालकांसह आॅल इंडिया लोको रनिंग स्टाफ युनियनचे सदस्य, रेल्वे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
भारतीय रेल्वे १९८० च्या कायद्यान्वये कि.मी. दरानुसार भत्ता घोषित व्हावा, सेवानिवृत्तांना पेंशन निर्धारीत करावी, रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देत प्रवाशांची काळजी घेण्यात यावी, चालकांच्या कुटुंबीयांचे प्रश्न-समस्या सोडविण्यात याव्यात आदी मागण्या रेल्वेचालकांनी मांडल्या. यावेळी सातवा वेतन आयोगाचा भत्ता जाहीर करण्यात यावा, यासाठी चालकांनी जोरदार निदर्शने केली.
आंदोलनात आर.पी. गेडाम, डी.जी. चौधरी, एस.पी. काकड, व्ही.एन. घोडस्वार या पदाधिकाºयांसह पी.एम. बागडे, यू.ई. गोडबोले, कांबळे, घरवाडे, उके, रिठे, सोनवणे आदी सहभागी होते.
रेल्वेचालकांच्या मागण्यांसाठी अन्य विभागातील कर्मचारीदेखील निदर्शने, आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, चालकांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध नारे देत मागण्यांकडे लक्ष वेधले. ४८ तास उपाशी राहून वेगळ्या पद्धतीने चालक, सहायक चालकांनी आंदोलन करून रेल्वे प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.