अमरावती विद्यापीठात राज्याबाहेरील व्यक्तींची कुलगुरू निवडीसाठी हालचाली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:29+5:302021-08-24T04:17:29+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे नवे कुलगुरूपदी महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींची निवड होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दरम्यान, २८ ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठवे नवे कुलगुरूपदी महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींची निवड होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दरम्यान, २८ व २९ ऑगस्ट रोजी कुलगुरू पदासाठी पात्र २० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यानंतर शार्ट लिस्ट म्हणून पाच उमेदवारांची अंतिम यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे कुलगुरू निश्चित होण्याचे संकेत आहेत.
अमरावती विद्यापीठात नवे कुलगुरू निवडीसाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून कुलगुरू पदासाठी पात्र उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने कुलगुरू पदासाठी १२० उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. समितीने अर्जाची छाननी करून पात्र २० उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण केले आहे. २८ व २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलाखती होऊन पाच जणांची अंतिम यादी (शार्ट लिस्ट) काढली जाणार आहे. समितीने पाठविलेल्या पाच नावांपैकी एक नाव राज्यपाल कोश्यारी हे अमरावती विद्यापीठाच्या नवे कुलगुरुपदासाठी निवडतील, अशी माहिती आहे. साधारणत: पुढील महिन्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील, असे संकेत आहे. राज्याबाहेरील कुलगुरू निवडीसंदर्भात विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
------------------
विद्यापीठाचा मानांकन दर्जा घसरला
अमरावती विद्यापीठाचे नुकतेच नॅक पिअर चमूकडून मूल्यांकन झाले. मात्र, अगोदर ‘अ’ श्रेणी असताना आता ‘ब’ श्रेणीत विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. संशोधन आणि विद्यार्थी प्रगतीवर नॅक चमूने बोट ठेवले आहे. मानांकन घसरल्याने अधिकारी वर्ग मानसिक दबावात आले आहे. अशातच नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया वेगवान होत असल्याने ‘नवा गडी, नवा राज’ असा कारभार लवकरच विद्यापीठात सुरू होणार आहे.