पथ्रोटमध्ये कोविड सेंटर उघडण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:56+5:302021-05-20T04:12:56+5:30
पथ्रोट : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न गावांमध्ये कोरोणा रुग्णांची संख्या व भविष्यात स्थिती चिघडू नये म्हणून पाठपुरावा करीत ...
पथ्रोट : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न गावांमध्ये कोरोणा रुग्णांची संख्या व भविष्यात स्थिती चिघडू नये म्हणून पाठपुरावा करीत असलेल्या जयसिंग सहकारी सोसायटीच्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. गावात कोविड केअर सेंटर उभारण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने उशिरा का होईना, मागणीची दखल घेतल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने पथ्रोट येथे कोविड सेंटरची गरज भासू शकते, हे ओळखून जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना पत्र पाठवून ते सुरू करण्यासाठी सोसायटीचे गोडाऊन देण्याची तयारी दर्शविली होती. या आधी कुणीही कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता वा कुणीही हालचाली केल्या नाहीत. मात्र, जयसिंग, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने कोविड सेंटरकरिता जागा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
जिल्हा प्रशासनाने पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेन्ट्रल सुरू करण्यासाठी हालचाली केल्याचे दिसून येत आहे. गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह जागेची पाहणी केली. त्यापूर्वी जयसिंग सोसायटीने दर्शविलेली जागा ही गावाच्या मध्यवस्तीत आहे. त्याठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्थाही नाही. त्यामुळे ही जागा सेंटरला दिल्यास सामान्य माणसांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, याउलट राज्य महामार्गावरील मंगल कार्यालय, शाळा वा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी व्हावे, असे आक्षेप काही जणांनी प्रशासनाकडे नोंदविले होते. परिणामी जिल्हा प्रशासनाने नव्याने बांधकाम झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कोविड सेंटर उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तथापि, येथे सर्व सुविधा तसेच उपचाराकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.