आमदार रवी राणांविरोधात खासदार आनंदराव अडसूळांची दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:15 AM2018-08-07T10:15:59+5:302018-08-07T10:16:21+5:30
बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात पुन्हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती - शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात पुन्हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा राणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रवी राणांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही तक्रार दाखल केली होती. यानंतर पुन्हा सोमवारी (6 ऑगस्ट) पुन्हा खासदार अडसूळ यांनी राणांविरोधात दुसऱ्यांदा तक्रार दाखल केली आहे.
29 जुलैच्या तक्रारीनंतर रवी राणा यांनी सोशल व प्रिन्ट मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या आरोपाची दुसरी तक्रार खासदार अडसूळ यांनी गाडगेनगर पोलिसांकडे नोंदवली आहे. यानुसार सोमवारी गाडगेनगर पोलिसांनी रवी राणा यांच्यासह सुनिल गंगाधर राणा, अनुप अग्रवाल व निलेश भेडेंविरोधात भादंविच्या कलम 500, 501, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 67 व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रवी राणांचा अडसूळ यांच्यावर आरोप
खासदार आनंदराव अडसूळ अध्यक्ष असलेल्या मुंबईतील सिटी बँकेत त्यांनी आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. डॉ. सुनील जाधल यांना कर्ज देण्यासाठी 20 टक्के कमिशन घेतल्याचा आरोप राणांनी केला आहे.