खासदारांची डेडलाईन फसवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 02:19 AM2015-12-29T02:19:08+5:302015-12-29T02:19:08+5:30
बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावर मागिल काही वर्षांपासून रेल्वे पूल व जोडरस्ता निर्मितीचे
रेल्वे प्रकल्पाचे काम लांबणार : बडनेरा मार्गावरील पूल, जोडरस्ता एप्रिलपासून सुरु होणे अशक्य
अमरावती : बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावर मागिल काही वर्षांपासून रेल्वे पूल व जोडरस्ता निर्मितीचे काम संथगतीने सुरु आहे. परिणामी हा चौपदरीकरण मार्ग नव्या वर्षात १ एप्रिलपासून सुरु करण्याची खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलेली डेडलाईन सद्यस्थितीत पूर्ण होणार नाही, हे स्पष्ट आहे.
अमरावती-बडनेरा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरु असले तरी नरखेड रेल्वे मार्गावर पुलाचे काम तसेच या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम काही वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. पूल व रस्ता निर्मितीचे काम ‘ठक्कर अॅन्ड संचेती कन्स्ट्रक्शन’ कंपनीने घेतले आहे. परंतु हे काम अतीशय संथगतीने सुरु असल्यामुळे बडनेरा मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान नरखेड मार्गावरील रेल्वेपूल, रस्ता निर्मितीचे काम ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करु न हा मार्ग १ एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी खासदार अडसूळ यांनी मुंबई मध्ये रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांना पत्रवजा डेडलाईन दिली होती. खासदारांनी दिलेल्या डेडलाईनुसार मध्यंतरी विकासकामांना गती मिळाली होती. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून हा चौपदीकरण मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल काय? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नरखेड मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून निर्माणाधीन पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी या पुलाला जोडणाऱ्या अप्रोच मार्ग अद्यापही पूर्ण व्हायचा आहे. तसेच जोडरस्ता निर्मितीचे काम रखडले असल्याचे दिसून येते. खासदार अडसूळ यांच्या डेडलाईनुसार या मार्गाचे काम पूर्ण करुन तो नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
बडनेरा मार्गावरील रेल्वे पूल, रस्तानिर्मिती स्थळाची पाहणी केली जाईल. १ एप्रिल २०१६ रोजी हा मार्ग सुरु व्हावा यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अवगत करु. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.
- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.
रेल्वे प्रकल्पाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, प्राधिकरणच्या जलवाहिनीचा अडथळा येत आहे. टार्गेटनुसार कामे होतील. जलवाहिनीहटविताच कामाला गती येईल.
- यू.डी. उदापुरे, सहायक अभियंता, रेल्वे नागपूर