पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद, माफी मागावी; काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 05:59 PM2022-01-16T17:59:27+5:302022-01-16T18:48:33+5:30
अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं.
अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. हा आरोप काँग्रेसकडून फेटाळण्यात आला आहे.
पुतळा हटविल्यानंतर, संतप्त कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली. कार्यकर्ते मात्र जोराजोरात घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर करीत त्यांना निवडणुकीत शिवप्रेमी जागा दाखवून देईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.
काँग्रेसने मात्र यासंदर्भात भाजपकडे बोट दाखवलं आहे, "अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. असे असताना भाजपचे नगरसेवक आणि रवी राणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर पुतळा हटाव प्रकरणी टीका करीत आहेत. काँग्रेसचा याच्याशी काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत," असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं आहे. तसेच, महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपनेच हा पुतळा हटवला. मग पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद आहे, असंही एडतकर म्हणाले. रवी राणा आणि महापालिकेत सत्ता असलेली भाजप या प्रकरणात संपूर्णतः जबाबदार असून शिवरायांच्या अवमानाबद्दल आता रवी राणा आणि भाजपाने माफी मागावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली आहे.
दरम्यान, १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, यासाठी कोणतीच परवानगी न घेतल्यामुळे हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांची गर्दी जमली. यावेळी, घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुतळा हटवण्याच्या घटनेचा निषेध करताना नवनीत राणा म्हणाल्या, "सदर ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, म्हणून तीन वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. पण वेळोवेळी प्रशासनाने ती परवानगी नाकारली." ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी घडवले त्यांचा पुतळा बसविण्याची परवानगी का गरजेची आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला होता.
नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पुतळा हटविल्यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. खासदार नवनीत राणादेखील चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारेही लावले. लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावं लागतयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि आदर्शांचा विसर पडलाय का? असे म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.