अमरावतीत राणा दाम्पत्य नजरकैदेत! मध्यरात्री कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:15 AM2022-01-17T09:15:25+5:302022-01-17T09:19:08+5:30

शिवछत्रपतींचा अनधिकृत पुतळा हटविला

mp navneet rana agitation over shivaji maharaj statue removed | अमरावतीत राणा दाम्पत्य नजरकैदेत! मध्यरात्री कारवाई

अमरावतीत राणा दाम्पत्य नजरकैदेत! मध्यरात्री कारवाई

Next

अमरावती : येथील राजापेठ उड्डाणपुलावर मां जिजाऊंच्या जयंतीदिनी, १२ जानेवारी रोजी शिवप्रेमींनी बसविलेला सहा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री प्रचंड बंदोबस्तात हटविला. तब्बल चार दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विनापरवानगी बसविलेला पुतळा हटविण्याची कारवाई केली.

आमदार रवि राणांनी दोन दिवसांपूर्वी पुतळा परवानगीसंदर्भात महापालिकेत बैठक घेतली. त्याचवेळी त्यांनी परवानगी देता येणार नाही, असे कारण समोर करून पुतळा हटविल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला होता. यावर महापालिका प्रशासनाने आपली भूमिका मात्र स्पष्ट केली नव्हती. दरम्यान रविवारी मध्यरात्रीनंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने उड्डाणपुलावरील पुतळा हटविला. यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते प्रचंड संतापले.

पुतळा हटविल्याची कारवाई झाल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्रीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले. राणा यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त असून राज्य राखीव दल, दामिनी पथक, राजापेठ पोलीस विशेष शाखा बारकाईने नजर ठेवून होते. वज्रसह दंगल विरोधी पथकदेखील तैनात आहेत. सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनी १९७३ च्या प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (३) द्वारे प्रदान अधिकाराचा वापर करून आ. रवि राणा यांना १६ जानेवारी रोजी निवासस्थानाबाहेर पडू नये, असा मनाई आदेश जारी केला आहे.

Web Title: mp navneet rana agitation over shivaji maharaj statue removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.