बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ नवनीत राणा मैदानात; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 03:09 PM2022-06-25T15:09:17+5:302022-06-25T15:27:03+5:30
बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना धोका असून, त्यांना सुरक्षा प्रदान करा, तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबत खासदार राणा यांनी शनिवारी एक व्हिडीओ जारी केला आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदारांना सुरक्षा आहे त्यांच्या कुटुंबीयांना नाही, असे व्यक्तव्य केले आहे. या व्यक्तव्याचा खासदार राणा यांनी खरपूस समाचार घेतला. संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचे आहे? तुम्ही बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना मारणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे बंडखोर आमदार आहेत, ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते पाईक आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परंतु आजमितीला शिवसैनिक गुंडगर्दी करीत असून, आमदार, खासदारांच्या कार्यालयाची तोडफोड करीत आहेत. महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची राजवट संपुष्टात आणण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.
एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार फोडले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना की शिंदेसेना? असा नवा वाद सुरू झाला आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे खरे शिवसैनिक असल्याची पावती खासदार नवनीत राणा यांनी दिली. बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.