छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 04:51 PM2022-02-16T16:51:39+5:302022-02-16T18:33:51+5:30
कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी यावेळी दिला.
अमरावती : शिवछत्रपतींचा पुतळा तेथेच बसवू, मात्र सनदशीर मार्गाने, परवानगी घेऊनच. महापालिका निवडणुकीनंतर सत्ता आल्यास पहिला ठराव तोच असेल, असा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला. १९ फेब्रुवारी रोजी युवा स्वाभिमान पक्ष कार्यकर्ते, मावळे, शिवप्रेमींनी शांततेच्या मार्गाने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधून मुख्यमंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर शरसंधान केले. जनप्रतिनिधी म्हणून महापालिका आयुक्तांनी आपल्याला भेट नाकारली. तर पोलीस आयुक्तांनी राजकीय दबावात येऊन खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. दोघांविरूद्धही हक्कभंग दाखल करून आपण त्यांना लोकसभा, मानवाधिकार आयोग, मागासवर्गीय आयोग व दक्षता समितीसमोर उभे करू, असा दावा देखील त्यांनी केला.
प्रत्येकाची वेळ येत असते. कुणीही अमृत पिऊन आलेले नाही. तिकडे मुख्यमंत्री मातोश्रीत बसून आम्हा दाम्पत्याला जेलमध्ये कसे टाकता येईल, याबाबत राजकारण करतात, तर इकडे महिला पालकमंत्री देखील षड्यंत्र करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शाईफेक प्रकरणी झालेले दबावाचे राजकारण कुणाच्याही पचनी पडलेले नाही. प्रशासनातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी देखील ३०७ चा गुन्हयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. मात्र आम्ही दबावतंत्राला बळी न पडता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊ, राजापेठ उड्डाणपुलासोबतच छत्री तलाव परिसरात देखील शिवछत्रपतींचा पुतळा उभारू, अशी माहिती देखील त्यांनी दिली. गुन्हा दाखल असलेल्या आमदार रवी राणा यांच्यासह अटक करण्यात आलेल्या कुणाचाही त्या शाईफेक प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे आमदार राणा हे फरार नाहीत, अटक करण्याचे काम पोलिसांचे आहे, अशी मल्लीनाथी देखील त्यांनी केली.
राऊतांची पत्रकार परिषद फक्त फुसका बारच
शिवसेना खासदार संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात व त्यात ते पोपटासारखे बोलतात. काल जी पत्रकार परिषद झाली, त्यात फक्त फुसका बारच होता. महिला व बालकल्याण विभागात जे घोटाळे झाले याची चौकशी ईडी मार्फत केली जाईल, अशा शब्दांत राणा यांनी राऊतांवर टीका केली.
दरम्यान, राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी विनापरवानगी पुतळा बसविला होता. हा पुतळा अनाधिकृत असल्याचं सांगत महापालिकेच्या वतीने तो पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. यावरून शहरातील वातावरण चांगलच तापलं होतं. पोलिसांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेत ठेवलं होतं. तर, आक्रमक झालेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर जमा होत आंदोलन केले होते.
त्या प्रकरणानंतर नुकतच महापालिका आयुक्तांवर शाई फेकण्यात आली होती. याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. खा. नवनीत राणा या आयुक्तांना भेटायला गेल्या होत्या. मात्र, आयुक्तांनी प्रकृतीचं कारण देत भेट नाकारली, यानंतर संतप्त नवनीत राणा यांनी आयुक्तांवर आरोपही केले होते. तर, आता पोलीस दबावाखाली काम करत आहेत. मुख्यमंत्री व पालकमंत्री हे वाईट राजकारण करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही खा. नवनीत राणा यांनी केला आहे.