'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 01:38 PM2022-04-16T13:38:09+5:302022-04-16T14:09:05+5:30
हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
अमरावती : अमरावतीत हनुमान चालिसा वरून जोरदार राजकीय वातावरण तापलं आहे. काल युवा सेनेने राणा दाम्पत्याच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. तर, आज शिवसेना मुख्यालय असलेल्या मुंबईतील 'मातोश्री' बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले आहे.
हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. संकटमोचक हनुमान आपल्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करेन, अशा शब्दात नवनीत राणा यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडले आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
आमच्या भावना आमचा धर्म जे सांगतो आम्ही त्याच पालन करतो व प्रचार करतो. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या विचारातून शिवसेना बनली, ती विचारधारा आज मातोश्रीत जीवंत आहे की नाही इतकंच मी म्हटलं होतं. त्यावरून मुर्दाबादचे नारे लावण्याची गरज नाही. यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन मुख्यमंत्र्यांना आपल्या विचारांची आठवण करून द्यावी, असे नवनीत राणा म्हणाल्या. दोन वर्षानंतर ते मुख्यमंत्री कार्यालयात गेले तर १० मिनीटे वेळ काढून देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे, असा टोमणा नवनीत राणांनी यावेळी लगावला.
राणा दाम्पत्यांस विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. मातोश्री हे आम्हाला मंदिरासमान आहे. जर, कोणी आमच्या देवळावर, मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर साहजिकच शिवसैनिक आक्रमक होतो, त्यामुळेच आज शिवसैनिक मातोश्रीबाहेर रस्त्यावर उतरला आहे, असे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी म्हटलं. दरम्यान, शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर केलेल्या गर्दीमुळे वांद्रे कलानगर परिसरात वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कार्यकर्त्यांना थोपविण्याचं काम पोलीस करत आहेत.
शिवसैनिकांचे राण दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. काल रात्री राणा दाम्पत्याच्या अमरावतीतील घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. तसेच लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा वाचून आंदोलन केले. ३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली.