नवनीत राणांना धमकी देणारा आरोपी ताब्यात, मोबाइल, सिम कार्ड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:12 IST2023-08-24T12:10:22+5:302023-08-24T12:12:33+5:30
गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

नवनीत राणांना धमकी देणारा आरोपी ताब्यात, मोबाइल, सिम कार्ड जप्त
अमरावती : खासदार नवनीत राणा यांना मोबाइलवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने २२ ऑगस्ट रोजी रात्री मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील एका शेतातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल व सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. श्याम विठ्ठलराव तायवाडे (३५, रा. नेरपिंगळाई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१६ ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती खा. नवनीत राणा यांच्या मोबाइलवर संपर्क साधून गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकी देत असून, त्याने अश्लील शिवीगाळदेखील केल्याची तक्रार राणा त्यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री राजापेठ ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ५०४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोन या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तपासात श्याम तायवाडे याचे नाव समोर आले. त्याला नेरपिंगळाई गावातील एका शेतातून ताब्यात घेण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखा पोलिस निरीक्षकद्वय राहुल आठवले व आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले व अनिकेत कासार, पोलिस उपनिरीक्षक राजकिरण येवले, राजेंद्र काळे, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, जगन्नाथ लुटे यांनी केली.