येवदा हद्दीतील कुख्यात आकाशविरूध्द एमपीडीए; एक वर्षांकरीता स्थानबध्द
By प्रदीप भाकरे | Published: June 28, 2023 05:27 PM2023-06-28T17:27:29+5:302023-06-28T17:27:52+5:30
विविध गंभीर गुन्हे दाखल
अमरावती: आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात आकाश नाना पुंडकर (२७, रा. वरूड कूलट ता. दर्यापूर) यास एमपीडीएअन्वये एक वर्षाकरीता जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.
कुख्यात गुंड आकाश पुंडकरविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई तसेच तडीपार कारवाई देखील करण्यात आली. परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तो वारंवार गुन्हे करीत होता. त्याची दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा, याकरीता पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे सादर केला. तो धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने जिल्हादंडाधिकाऱ्यांनी त्यास एक वर्षाकरीता अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश २८ जून रोजी पारीत केला.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहेकॉ अमोल देशमुख तथा येवद्याचे ठाणेदार आशिष चेचरे यांनी परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसपी अविनाश बारगळ यांनी दिली. यंदाच्या सहा महिन्यातील हा सहावा एमपीडीए ठरला आहे.