कुख्यात मामूविरूध्द एमपीडीए; वर्षभरासाठी सेंट्रल जेलचा पाहुणा! या वर्षातील सातवा एमपीडीए
By प्रदीप भाकरे | Published: September 15, 2024 02:54 PM2024-09-15T14:54:32+5:302024-09-15T14:54:53+5:30
अभिषेक उर्फ मामु हा सन २०१९ पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचेविरूध्द राजापेठ, फ्रेजरपुरा ठाण्यात खून, जबरी चोरी, दरोडा, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवून दंगा करणे, अग्निशस्त्र बाळगणे, अधिसुचनांचे उलघंन करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहे.
अमरावती: खून, दरोड्यासह सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार अभिषेक उर्फ मामु रमेश डिक्याव (२३, रा. मेहरबाबा कॉलनी, जेवड नगर, अमरावती) याच्याविरूध्द एमपीडीएअन्वये कारवाई करण्यात आली. त्यानुसार त्याला १४ सप्टेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबध्द करण्यात आले.
अभिषेक उर्फ मामु हा सन २०१९ पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचेविरूध्द राजापेठ, फ्रेजरपुरा ठाण्यात खून, जबरी चोरी, दरोडा, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवून दंगा करणे, अग्निशस्त्र बाळगणे, अधिसुचनांचे उलघंन करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते. तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरूध्द एमपीडीए करण्याबाबतचा प्रस्ताव राजापेठ पोलिसांनी पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाची गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील एमपीडीए सेलमधील सहायक पोलीस निरिक्षकइम्रान नायकवडे, पोलीस अंमलदार विनय गुप्ता, अजय मिश्रा, चेतन कराडे यांनी पुर्तता केली. त्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी १४ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांनी तो आदेश तामिल करून त्यास स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
रेड्डींच्या कार्यकाळातील १६ वा एमपीडीए -
नवीनचंद्र रेड्डी यांनी डिसेंबर २०२२ मध्ये अमरावती शहर पोलीस आयु्क्तपदाचा कार्यभार स्विकारला होता. गुन्हेगारीला प्रतिबंध व गुन्हयांना अटकाव घालण्यासाठी रेड्डी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या आयुधांचा प्रभावी वापर केला. मामूविरूध्द केलेला एमपीडीए यंदाच्या वर्षातील सातवा ठरला आहे. तर रेड्डी यांच्या कार्यकाळात आतापर्यंत १६ कुख्यातांविरूद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.