‘छोटा रिचार्ज’वर एमपीडीए; वर्षभर कारागृहात स्थानबध्द
By प्रदीप भाकरे | Published: June 2, 2023 06:14 PM2023-06-02T18:14:10+5:302023-06-02T18:15:17+5:30
३० मे रोजीच्या आदेशानुसार त्याला तातडीने वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.
प्रदीप भाकरे, अमरावती : पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार सैय्यद फैजान ऊर्फ छोटा रिचार्ज वल्द सैय्यद शफी (२२, रा. ताज नगर) याच्याविरूध्द एमपीडीए’अन्वये कारवाई केली.
३० मे रोजीच्या आदेशानुसार त्याला तातडीने वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले. नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी छोटा रिचार्जविरुद्धचा एमपीडीए प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत आयुक्तांकडे सादर केला होता. त्या एमपीडीए प्रस्तावाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत पुर्तता करून पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी त्याच्या स्थानबध्दतेचे आदेश काढले.
ठाणेदार मेश्राम यांनी आदेश तामील करून त्याला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.छोटा रिचार्ज हा सन २०१९ पासून गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याच्याविरुध्द नागपुरीगेट, सिटी कोतवाली आणि गाडगे नगर येथे प्राणघातक शस्त्रासह स्वतः व त्याचे इतर साथीदारासह गैर कायदयाची मंडळी जमवुन खूनाचा प्रयत्न, खून, जबरी चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगणे, तडीपार आदेशाचे उल्लंघने करणे असे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधक व तडिपार कार्यवाहीला तो न जुमानल्याने त्याच्याविरूध्द एमपीडीए करण्यात आला.