दर्यापूरच्या श्री बालाजी जिनिंगला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:15 PM2018-01-17T23:15:41+5:302018-01-17T23:16:32+5:30
अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगमध्ये बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून सुमारे तीन हजार क्विंटल कापूस जळाला.
आॅनलाईन लोकमत
दर्यापूर : अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगमध्ये बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून सुमारे तीन हजार क्विंटल कापूस जळाला. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दर्यापूरसह नजीकच्या तालुका मुख्यालयातून पाठविलेल्या पाच अग्निशमन बंबांनी नियंत्रणात आणली.
श्री बालाजी जिनिंगच्या आवारात असलेल्या कापसाच्या पाच ढिगांना आग लागल्याचे दिसताच जिनिंगच्या संचालकांना अग्निशमन दलाला माहिती दिली. दर्यापूर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, एवढ्याने आग नियंत्रणात येणार नसल्याचे दिसताच नजीकच्या अंजनगाव सुर्जी, आकोट, मूर्तिजापूर, अचलपूर येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले. दरम्यान, आग वाढत असल्याने दर्यापूर नगर परिषदेच्या टँकरचा वापर करून नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
आग लागल्यानंतर धुरामुळे काही काळ अकोला मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. बघ्यांची गर्दी जमल्यानेही काही काळ वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळताच आ. रमेश बुंदिले, तहसीलदार अमोल कुंभार, एसडीपीओ सचिन हिरे, ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अग्निशमन वाहनांना मार्गात अडचण होणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घेतली.
दरम्यान, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, शॉट सर्किट किंवा जिनिंगच्या पट्ट्याच्या ठिणगीने आग लागल्याचा अंदाज आहे.
व्यापाऱ्यांची धावपळ
व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी आणला होता. आग लागल्याचे कळताच जिनिंगच्या आवारातून मोटारी नेण्यासाठी लगबग झाली. व्यापाऱ्यांच्या तीन वाहनांना आग लागल्याची माहिती असून, त्यांनी आपला माल आवारातच फेकून दिला.
कपासाच्या गंजीला आग कशामुळे लागली, याची माहिती मिळाली नाही. मात्र, कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
- नंदू सोमाणी
संचालक, श्री बालाजी जिनिंग