एम.एस. रेड्डी हाजीर हो... महिला आयाेगाने पाठविले समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:08+5:302021-03-31T04:14:08+5:30
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना सोमवारी रात्री राज्य महिला ...
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना सोमवारी रात्री राज्य महिला आयोगाने समन्स पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले. राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने ही कारवाई महिला आयोगाने आरंभली आहे. हरिसाल येथील दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आता महिला आयोगाने कठाेर पावले उचलली आहेत.
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा कंटाळून २५ मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली यांनी चार पानांची सुसाईड नाेट लिहून ठेवली आहे. यात विनोद शिवकुमार याने कशाप्रकारे त्रास दिला, ॲट्रासिटी दाखल करण्यात त्याने कशा पुढाकार घेतला, जंगलात पायी चालविल्याने गर्भपात झाला, अशा एक ना अनेक घटना दीपाली यांनी नमूद केल्या. हा सर्व प्रकार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा सांगितल्या. मात्र, आयएफएस लॉबी करून रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याला बळ दिले. त्यामुळे विनोद शिवकुमार याने सतत शारीरिक, मानसिक त्रास दिला.
एम.एस. रेड्डी यांनी हा प्रकार वेळीच रोखला असता, तर दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवला नसता, अशी भावना जनमानसात आहे. आता विनोद शिवकुमार आरोपीच्या पिंजऱ्यात असून, रेड्डी हेदेखील तितकाच दोषी असल्याने महिला आयोगाने त्यादिशेने कार्यवाही आरंभली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी एम.एस. रेड्डी याने आतापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विशाखा समितीचे स्वरूप, बैठकी आणि महिला तक्रारीच्या अनुषंगाने प्रकरणांचा निपटारा आदी बाबींवर महिला आयोगाचा फोकस असणार आहे. एम.एस. रेड्डी यांना व्यक्तिश: महिला आयोगाने समन्स पाठवून बाजू मांडण्याची संधी दिली आहे.
----------------------
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला विनोद शिवकुमार आणि एम.एस. रेड्डी तितकेच दोषी आहे. कनिष्ठ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबविण्यास रेड्डी याने कुचराई केली. मर्जीतील अधिकाऱ्यांना बळ दिले. त्यामुळे ‘डॅशिंग लेडी’ दीपाली यांना आत्महत्या करावी लागली.
- यशोमती ठाकूर, महिला व बाल कल्याण मंत्री