महापालिकेचा ‘शॉक’ लागताच महावितरणच्या वरिष्ठांची आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:34+5:302021-07-02T04:10:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : थकीत वीज बिलापोटी महावितरणने अमरावती शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करताच महापालिकेने मालमत्ता कराचा भरणा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : थकीत वीज बिलापोटी महावितरणने अमरावती शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करताच महापालिकेने मालमत्ता कराचा भरणा न केल्याचा ठपका ठेवत महावितरणला जप्तीची नोटीस बजावून ‘जोर का झटका’ दिला. महावितरणला हा शॉक एवढा जोरदार बसला की, अमरावती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी खुद्द महावितरणचे संचालक शुक्रवारी अमरावतीत येत आहेत. वरकरणी ही आढावा बैठक असल्याचे सांगण्यात येत असले तरी महापालिका विरुद्ध महावितरण या वादाचे पडसाद या बैठकीत उमटणार आहेत.
विद्युत भवनात शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित या बैठकीला महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत प्रामुख्याने उपस्थित राहणार असून अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता या पदांवरील वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर राहणार असल्याची सूत्राची माहिती आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक वीज ग्राहकांनी देयके भरली नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात पोहोचला असल्याचे अधिकारी सांगतात. त्याचाच आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याचेही ठासून सांगितले जात आहे. वीज बिल माफीचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून गाजत असताना महावितरणला अशा प्रकारच्या बैठकीची गरज भासली नव्हती. दरम्यान, महापालिकेने जप्तीचा बडगा उगारताच बैठकीचे तडकाफडकी आयोजन करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर महावितरण कार्यालय परिसरात सुरू होती.