महावितरण करणार थकबाकीचे समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:47+5:302021-07-03T04:09:47+5:30
अमरावती : महापालिका आणि महावितरणचा वाद मिटण्याची चिन्हे आहेत. महावितरणट्या वित्त अधिकाऱ्यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी संवाद साधून थकबाकीसंदर्भात माहिती ...
अमरावती : महापालिका आणि महावितरणचा वाद मिटण्याची चिन्हे आहेत. महावितरणट्या वित्त अधिकाऱ्यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी संवाद साधून थकबाकीसंदर्भात माहिती घेतली. सोमवारनंतर समायोजन संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला जाणार आहे. त्याच्या मंजुरीनंतर दोन्ही विभागादरम्यान थकबाकीचे समायोजन होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
महापालिकेकडील १३.६५ कोटींच्या थकबाकीमुळे सोमवारी महावितरणद्वारा पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर महापालिकेनेही १५ कोटींच्या थकबाकीसाठी महावितरण जप्ती नोटीस बजावली व एका कार्यालयाला जप्तीनामा लावला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले. दरम्यान महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला व थकबाकीसाठी समायोजनाची तयारी दाखविली. दरम्यान महावितरणचे व्यवस्थापकीय संचालकांनी शुक्रवारी अमरावती मंडळाचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.
महावितरणची महापालिकेकडे १५ कोटींची थकबाकी आहे. यासंदर्भातील ठराव व अन्य कागदपत्रांची मागणी महापालिकेकडे करण्यात आलेली आहे. यानंतर महावितरण वरिष्ठ कार्यालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठविणार आहे. त्याच्या मंजुरीनंतरच समायोजनाची प्रक्रिया होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
अशी आहे थकबाकीची रक्कम
महावितरणची १८ कोटींची थकबाकी महापालिकेकडे आहे, तर महावितरणकडे १३.६५ कोटी एलबीटी, १.२० कोटी मालमत्ता कर व अनधिकृत बांधकामप्रकरणी १.६९ कोटी असल्याची माहिती आहे. साधारणपणे २०१५ पासून या रकमेचे समायोजन झालेले नाही. महापालिकेद्वारा वारंवार सूचना देण्यात आल्यावरही प्रस्ताव पडून असल्याची माहिती आहे.