येवदा येथे महावितरणची घिसाडघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:01+5:302021-06-09T04:16:01+5:30
अनेक विद्युत पोल कोलमडून पडले, ५० ते ६० पोल पडण्याच्या स्थितीत, तत्काळ कारवाईची प्रहारची मागणी अनंत बोबडे दर्यापूर : ...
अनेक विद्युत पोल कोलमडून पडले, ५० ते ६० पोल पडण्याच्या स्थितीत,
तत्काळ कारवाईची प्रहारची मागणी
अनंत बोबडे
दर्यापूर : तालुक्यातील येवदा सेक्शनमध्ये पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने नियोजनाचा कंत्राट एका कंत्राटदाराला दिला होता. परंतु त्यांनी कोणतेच नियोजन न केल्यामुळे पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाचा फटका महावितरणसह ग्राहकांना सहन करावा लागला. यातील कित्येक पोल कोलमडून पडले, तर ५० ते ७० विद्युत पोल अद्यापही वाकलेले असल्याने ते पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. महावितरणच्या अनियोजनाचा व कंत्राटदाराच्या कामांची चौकशी व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहारचे प्रदीप वडतकर यांनी दिला आहे.
पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्तीकरिता संबंधित ठेकेदार करण बोदळे यांना कामाचा आदेश देण्यात आला होता. परंतु पावसाळ्यापूर्वी कुठेच वीजपुरवठा खंडित होणार नाही, अशी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे यावर्षी अवकाळी पावसामुळे येवदा सेक्शन परिसरात वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. येवदा सेक्शन परिसरातील जवळपास सर्वच गावे ४८ तासांपेक्षा अधिकवेळ संबंधित ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे अंधारात होती. त्यामुळे परिसरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला.
तसेच येवदा सेक्शनमधील ११ केव्ही अतिउच्च दाबाची जिवंत वीज वाहिणीचे पोल शिकस्त झाले असून, बरेच पोल वाकले. वादळी वाऱ्यामुळे केव्हाही पडू शकतात. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शकता टाळता येत नाही. असे असताना वीज वितरण कंपनीचे त्यावर कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही.
येवदा हे गाव दाट वस्तीचे असल्याने बरेचसे विद्युत पोल काही घरांच्या अतिजवळून गेलेले आहेत. त्यातील काही लोखंडी पोल बुडातून सडल्याने शिकस्त झाले आहेत. पावसाळ्यात केव्हाही पोल घरावर पडून फार मोठा अनर्थ होऊ शकतो. गावातील पोल दुरुस्तीबाबत कुठल्याही प्रकारची उपाययोजना विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात आलेली नाही. वीज कंपनीने तात्काळ पंचनामे करून शिकस्त झालेले पोल काढून नवीन पोल उभारावे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.