चिखलदरा हाऊसफुल्ल; २० हजार पर्यटकांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:22 AM2019-07-29T01:22:47+5:302019-07-29T01:23:12+5:30
विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याचे तुषार अंगावर घेत पर्यटकांनी संततधार पावसाचा आनंद घेतला. अनेक पॉइंटवर वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याचे तुषार अंगावर घेत पर्यटकांनी संततधार पावसाचा आनंद घेतला. अनेक पॉइंटवर वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते.
दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे चिखलदरा पर्यटनस्थळाच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आपसूकच घाट वळण्याच्या नागमोडी रस्त्यावर वळू लागली. विकेन्डला २० हजारांवर पर्यटक आल्याने नगरपालिकेला १ लाख २० हजारांपेक्षा अधिकचा महसूल मिळाला. पर्यटकांची गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, लेखापाल प्रमोद वानखडे, प्रदीप जोशी, दुर्गेश पाल, अंतुलाल कास्देकर, नगरपालिकेचे अन्य कर्मचारी पर्यटक कर नाक्यावर तैनात होते.
रस्ता खचल्याची अफवा
चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाणारा मार्ग खचल्याची अफवा रविवारी दिवसभर सोशल मीडियावर होती. प्रत्यक्षात ते छायाचित्र पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरकडे जाणाºया रस्त्याचे होते. त्याचा संबंध अनेकांनी चिखलदरा पर्यटनस्थळाशी जोडून अफवा पसरवली. यासंदर्भात ‘लोकमत’ पुणे आवृत्तीत प्रकाशित छायाचित्र सत्यता दर्शविणारे ठरले. याबाबत अनेकांनी समाजमाध्यमांद्वारे शंकांचे निरसन केले.
वाहतूक ठप्प
शनिवार-रविवारी सुटीच्या दिवसांत शेकडो पर्यटक चिखलदऱ्याला भेटी देतात. रविवारी रात्रीपर्यंत चिखलदºयात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी सुरू होती. नगरपालिकेच्या पर्यटक नाक्यासह येथील भीमकूंड, देवी पॉइंट, गाविलगड किल्ला, मोझरी पॉइंट, पंचबोल, हरिकेन पॉईंट, वनउद्यान, जत्राडोह यासह इतर पॉईंटवर पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास चार हजारांवर कार तर दोन हजार पर्यटक दुचाकीवर आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.