हिरदामलच्या आदिवासींना शेततळ्याचे गढूळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:46+5:302021-06-18T04:09:46+5:30
जलजन्य रोगाची भीती, चार दिवसांपासून गाव लागले नाल्यावर पाणी भरायला चिखलदरा : तालुक्यातील बदनापूर ग्रामपंचायत अंतर्गत हिरदामला येथे चार ...
जलजन्य रोगाची भीती, चार दिवसांपासून गाव लागले नाल्यावर पाणी भरायला
चिखलदरा : तालुक्यातील बदनापूर ग्रामपंचायत अंतर्गत हिरदामला येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर जळाल्याने आदिवासींना दोन किलोमीटर अंतरावरील नाला तसेच शेततळ्याच्या विहिरीतून गढूळ पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. परिणामी पावसाळ्याच्या तोंडावर जलजन्य आजारांची लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हिरदामल गावाची लोकसंख्या सुमारे
८०० आहे. या नागरिकांना चार दिवसापासून पाण्यासाठी आदिवासी दोन किलोमीटर अंतरावरून एका नाल्यात असलेल्या विहिरीतील गढूळ पाणी आणावे लागत आहे. सदर ग्रामपंचायतीचे सचिव रामलाल बेलसरे दोन महिन्यांपासून आजारी असल्याने ग्रामपंचायतीला अंबापाटी येथील ग्रामसेविकाकडे प्रभार देण्यात आला आहे. हातपंप नादुरुस्त झाल्याने आणि पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील मोटर बंद पडल्याने दूषित पाण्यातून आदिवासींना जलजन्य रोगाची लागण होण्याची भीती पाहता, तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी माजी सरपंच गानू सावलकर यांनी केली. सरपंच अनिल चिमोटे ग्रामपंचायतीचा सचिवांविना पांगुळगाडा झाल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’ला दिली आहे.
कोट
हिरदामल येथील पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेश अतिरिक्त पदभार असलेल्या अंबापाटी येथील ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत.
प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, चिखलदरा
कोट
चार दिवसांपूर्वी पाऊस आल्याने विहिरीतील मोटर जळाली. हातपंप नादुरुस्त आहे. कार्यरत ग्रामसेवक बेपत्ता असून, स्वतः ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहे.
- अनिल चिमोटे, सरपंच, बदनापूर