बाजार समित्यांमध्ये मुगाचे मातेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 09:58 PM2018-09-11T21:58:28+5:302018-09-11T21:58:54+5:30
मुगाच्या हंगामाला या आठवड्यात सुरुवात झाली. अडचणीतील शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये मूग विकायला आणला. मात्र, हमीभाव ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल असताना चार हजार रुपये दर व्यापारी देत आहेत. याप्रकरणी किती व्यापाºयांवर कारवाई केली अन् हेच का अच्छे दिन, असा शेतकºयांचा सवाल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुगाच्या हंगामाला या आठवड्यात सुरुवात झाली. अडचणीतील शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये मूग विकायला आणला. मात्र, हमीभाव ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल असताना चार हजार रुपये दर व्यापारी देत आहेत. याप्रकरणी किती व्यापाºयांवर कारवाई केली अन् हेच का अच्छे दिन, असा शेतकºयांचा सवाल आहे.
यंदाच्या हंगामात खरिपाचा पाऊस उशिरा आल्यामुळे दोन महिने कालावधीच्या मूग व उडदाचे पेरणीक्षेत्र कमी झाले. पीक फुलोऱ्यावर आल्यावर व शेंगा भरण्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने सरासरी उत्पादन घटले. बँका कर्ज नाकारत असल्यामुळे अडचणीतील शेतकºयांनी मूग बाजारात विक्रीसाठी आणला असता, व्यापाºयांनी भाव पाडले आहत. यंदाच्या खरिपासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाद्वारा ११ जुलै रोजी मुगाला ६,९७५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यापेक्षा कमी दर अपेक्षित नसताना प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये ३८०० ते ४३०० रुपये यादरम्यान भाव बाजार समितीत मिळत आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यामुळे मुगाचे सरसरी एकरी दोन क्विंटल उत्पादन झाले. यामध्ये पेरणी, बियाणे, खत, निंदन , डवरणी, सोंगणी व काढणीचा खर्च गृहीत धरता, उत्पादनखर्चाच्या निम्मे रक्कमदेखील शेतकºयांच्या हाती पडत नसल्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये आता मुगाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव पाडले. याला बाजार समिती संचालक मंडळासह जिल्हा उपनिबंधकांचा अटकाव नसल्यामुळे व्यापारी शिरजोर झाले आहेत.
उत्पादनात घट, भाव कमी
यंदाच्या खरिपात जिल्ह्यात २२ हजार ३०० हेक्टर मुगाचे क्षेत्र आहे. यामध्येही १८ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या दर्यापूर तालुक्यात आहे. त्यामुळे यंदा मुगाच्या उत्पादनात घट होणार, हे वास्तव आहे. मागणी जास्त आणि उत्पादनात घट यामुळे भाववाढ अपेक्षित असताना हमीभावापेक्षा तीन हजार रूपयांनी मुगाची विक्री होत आहे. अमरावती बाजार समितीमध्ये ३५०० ते ५००० या भावाने मंगळवारी मुगाची खरेदी झाली.
शासकीय खरेदी केव्हा?
बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या आत शेतमाल विकला जात असेल, तर शासनाद्वारे आधारभूत किमतीने शेतमालाची खरेदी होते. यंदा मूग बाजारात हमीभावापेक्षा तीन हजार रुपये कमी दराने विकला जात आहे. त्यामुळे नाफेडद्वारे खरेदीची प्रतीक्षा आहे. मात्र, शासनस्तरावर त्याबाबत हालचाली नाहीत. अनेक जिल्ह्यांमधून बाजार समित्यांनी पत्र दिले असताना शासनाने अद्याप केंद्राला प्रस्ताव पाठविलेला नसल्याची माहिती आहे.