मेळघाटात फगव्याला प्रारंभ; रस्त्यावर, घरोघरी, नृत्य, संगीताची तालावर रकमेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:31 PM2020-03-11T18:31:50+5:302020-03-11T18:33:15+5:30
मेळघाटातील आदिवासी बांधवांचे सर्वात मोठे होळी सणाला मंगळवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
- श्यामकांत पाण्डेय/धारणी
अमरावती : मेळघाटातील आदिवासी बांधवांचे सर्वात मोठे होळी सणाला मंगळवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आपापल्या गावातील होळी जाळल्यानंतर आता पुरुष-महिलांचे टोळके दुसऱ्या गावात फगवा मागण्यासाठी निघाल्या आहेत. ज्यांच्याशी त्यांची ओळख असते, अशा लोकांकडून हक्काने फगवा मागितला जात आहे. कोणत्याही प्रकारची बळजबरी किंवा आग्रह न बाळगता, जे काही मिळेल ते स्वीकारीत घराघरांतून फगवा वसुली करण्यात येत आहे.
‘बेचो तुम्हारी जोरु का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डंडा जली गयो रे, देओ हमारा फगवा देओ’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे. त्यानिमित्ताने होळी जळाल्यानंतर आत रंगपंचमीनिमित्त पुढील पाच दिवस फगवा उत्सवाची धूम सुरू झाली आहे.
रस्ता अडवा - फगवा मिळवा
ज्या पद्धतीने शासन ‘पाणी अडवा - पाणी जिरवा’ योजना राबविते, त्याचप्रमाणे आदिवासी बांधव होळीनंतर मेळघाटातील रस्त्यांवर लाकूड व दगड टाकून वाट अडवितात. येणाºया-जाणाºया वाहनचालकांकडून फगवा वसुल केल्यावरच रस्ता मोकळा करण्यात येतो. यात कोणत्याही वाहनाची गय केली जात नाही. खासगी, शासकीय, एसटी बस, एवढेच नव्हे तर पोलिसांचे वाहनही याला अपवाद ठरत नाही. लोकंही काही काळ ना-ना म्हणत फगवा देऊन आपली सुटका करुन घेतात.
बालगोपालांची गाणे
‘जल्दी जल्दी देना बाई, भोकरबर्डी जाना है, आलू का चटणी हम नदी खाना, क्यों नही खाना, मिठा नहीं लगता’ आणि ‘कोठी से निकाल, सुपडे मे डाल’ असे गाणे म्हणत, नाचत-गात बालगोपालांचादेखील फगवाचे उत्सव मेळघाटात पाहावयास मिळत आहे.