दसऱ्याला कापूस खरेदीचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 09:50 PM2018-10-05T21:50:53+5:302018-10-05T21:52:05+5:30
जिल्ह्यातील कपाशी लागवडीला जुलैचा दुसरा आठवडा उजाडल्यामुळे यंदा कापसाच्या हंगामाला उशिरा सुरुवात होणार आहे. या पार्श्वभुमीवर ‘सीसीआय’द्वारा दसºयाला तीन केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त साधणार आहे. केंद्राने कापसाच्या हमीभावात यंदा एक हजार रुपयांची घसघशीत वाढ केल्यामुळे पणन महासंघाला यंदा सुगीचे दिवस येणार आहेत. सीसीआयची अभिकर्ता असलेल्या पणन महासंघाद्वारा यंदा सहा केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील कपाशी लागवडीला जुलैचा दुसरा आठवडा उजाडल्यामुळे यंदा कापसाच्या हंगामाला उशिरा सुरुवात होणार आहे. या पार्श्वभुमीवर ‘सीसीआय’द्वारा दसऱ्याला तीन केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त साधणार आहे. केंद्राने कापसाच्या हमीभावात यंदा एक हजार रुपयांची घसघशीत वाढ केल्यामुळे पणन महासंघाला यंदा सुगीचे दिवस येणार आहेत. सीसीआयची अभिकर्ता असलेल्या पणन महासंघाद्वारा यंदा सहा केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे.
यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात २ लाख ४ हजार हेक्टरमध्ये कपाशीचे क्षेत्र आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रकोप झाल्यामुळे यंदा बागायती कपाशीची लागवड नगण्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कापूस वेचणीला सुरुवात नाही. मात्र, दसऱ्यानंतर वेचणीला सुरुवात होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) द्वारा कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सीसीआयद्वारा राज्यात ६४ केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे व येत्या १५ आॅक्टोबरला खरेदी सुरू करण्याचे सुतोवाच प्रधान कार्यालयाद्वारा करण्यात आले. जिल्ह्यात सीसीआयद्वारा धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व तळेगाव दशासर येथे केंद्रे राहणार आहेत. अद्याप कापूस वेचणीला सुरुवात न झाल्यामुळे सीसीआय दसरा व पणन महासंघ धनत्रयोदशीचा मुहूर्त साधणार असल्याची माहिती आहे.
मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आवक कमी असल्याने व खासगी बाजारात हमीपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनाच कापूस विकला. त्यामुळे सीसीआय व पणनच्या केंद्रावर उद्घाटनाही कापूस मिळाला नव्हता. यंदा स्थिती विपरीत आहे. केंद्र शासनाने लांब धाग्याच्या कापसाला ५४५० रूपये भाव दिल्याने खरेदी केंद्रांना सुगीचे दिवस येणार आहे.
टेंडर रिकॉलनंतर ‘पणन’ची प्रक्रिया
‘सीसीआय’ची सबएजंट असणाºया पणन महासंघाद्वारा अमरावती, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा व वरूड येथे केंदे्र सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिनिंग व प्रेसींग केंद्रासाठी निविदा बोलाविण्यात आल्यात. मात्र, एकाही प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची त्रुटी तसेच दरदेखील नमूद नसल्यामुळे टेंडर रिकॉल करण्यात आले आहेत. त्यामुळे पणन दसºयाचा मुहूर्त साधणार नसल्याचे चित्र आहे.
‘पणन’ला तीन महिन्यांची मुदत
कॉटन कॉरर्पोरेशन आॅफ इंडियाची अभिकर्ता म्हणून पणन महासंघाला तीन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने कापसाचा हंगाम हा दिवाळीपश्चातच सुरू होतो. त्यामुळे अगोदर केंद्र सुरू करून ऐन हंगामाच्या काळात बंद होऊ नये, यासाठी सीसीआयच्या तुलनेत पणन महासंघाद्वारा खरेदीची प्रक्रिया उशिरा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
व्यापाऱ्यांद्वारे पितृपक्षानंतर खरेदी
गणपती विसर्जनानंतर पितृपक्ष सुरू होतो व पंधरा दिवसानंतर शारदीय नवरात्र सुरू होण्याच्या आदल्या दिवशी समाप्त होतो. या अवधीत व्यापारी बहुधा खरेदीचा मुहूर्त साधत नसल्यामुळे दसºयाच्या दिवशीच व्यापारी व खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा नारळ फुटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा कपाशीची लागवडदेखील उशीराच झाली व धूळपेरणी नसल्यामुळे अद्याप कापूस वेचणी सुरू झालेली नाही.
पणन महासंघाद्वारा जिल्ह्यात सहा केंद्रांवर खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. काही तांत्रिक कारणांंमुळे निविदाची पुनर्प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आदेश येताच केंद्र सुरू केले जातील.
- डी. यू. कांबळे, विभागीय व्यवस्थापक, पणन महासंघ
जिल्ह्यात खरेदी केंद्राची प्रक्रिया सुरू आहे. यंदा हमीभावात वाढ झाल्याने सर्वाधिक कापूस खरेदी पणन महासंघाच्या केंद्रावरच होईल. दसऱ्यानंतर सहा खरेदी केंद्रे सुरू होतील. याबाबत आदेशाची प्रतीक्षा आहे.
- छाया दंडाळे, संचालक, पणन महासंघ, मुंबई