‘मुक्तागिरी चलो रे... मुक्तागिरी’, जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरीवर पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 07:49 PM2018-10-02T19:49:56+5:302018-10-02T20:00:03+5:30
श्री. दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरीवर पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म बनविण्यात आली आहे. मुक्तागिरीच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे.
- अनिल कडू
परतवाडा : श्री. दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरीवर पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म बनविण्यात आली आहे. मुक्तागिरीच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयत्न ठरला आहे.
या डॉक्युमेन्ट्री फिल्ममध्ये ‘मुक्तागिरी चलो रे... मुक्तागिरी’ हे गीत सुप्रसिद्ध गायिका श्रीमती दीपा उदित नारायण यांनी गायिले आहे. टीव्ही सिरीज ‘महाभारत’ला आवाज देणारे आवाजकार हरीश भिमानी यांनी या डॉक्युमेंट्रीला आपला आवाज दिला आहे. हरीश भिमानी राष्ट्रीय पातळीवरील आवाजकार असून त्यांना २०१६ चा नॅशनल फिल्म अवार्डही मिळाला आहे. या डॉक्युमेंट्री फिल्मवर मुंबई-गोरेगाव येथील स्टुडिओत संस्कार करण्यात आले आहेत.
३५ मिनिटाच्या या फिल्मला मुंबईचे महेश दुबे आणि अक्ष्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. सूत्रसंचलन सुद्धा यांनीच केले आहे. पुणे येथील श्रीमती शुभाली शांतीकुमार शहा आणि परिवार यांच्याकडून या फिल्मला मदत लाभली आहे.
ही डॉक्युमेंट्री फिल्म मुक्तागिरी येथील डॉक्युमेंट्री हॉलमध्ये दर दोन तासांनी जैन तीर्थयात्री, पर्यटक आणि शालेय विद्यार्थ्यांना व उपस्थिताना दाखविण्यात येणार आहे. फिल्मचे सर्व अधिकार श्री दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ट्रस्ट कमेटीकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
मुक्तागिरी येथील नैसर्गिक सौंदर्य, मंदिरांची रचना व अति प्राचिनता, मूर्ती शिल्प, भगवान पार्श्वनाथ, सातपुडा पर्वत श्रृंखला, जैन धर्म व तत्त्वज्ञान, धार्मिक विधी, उत्सव-पर्व यासह सिद्धक्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये समाविष्ट आहे.
संपूर्ण भारतातून जैन तीर्थयात्रेकरू व पर्यटक मुक्तागिरी येथे येतात. दरवर्षी दोनशे ते चारशे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली मुक्तागिरी येथे येतात. मुक्तागिरी या सर्वांचे आकर्षण, देशपातळीवर प्रचार व प्रसारासह येणा-या प्रत्येकाला मुक्तागिरीविषयी, जैन धर्म आणि तत्त्वज्ञान याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने ही डॉक्युमेंट्री फिल्म बनविण्यात आली आहे.
परतवाडा शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील मुक्तागिरी सिद्धक्षेत्र मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यांतर्गत भैसदेही तालुक्यात येते. येथील सातपुडा पर्वताच्या शिखरावरील ५२ मंदिरांपैकी काही मंदिरात जाण्यास दीड-दोन वर्षांपासून अडचणी येत होत्या. शिखरावरील पर्वताच्या कडा, दगड कोसळत होते. यावर उपाय करण्याकरिता रॉक फॉल प्रोटेक्शन वॉलकरिता मध्यप्रदेश सरकारने तीन कोटी रूपयांचा निधी दिला. या निधीतून रॉक फॉल प्रोटेक्शनची कामे झाली आहेत. पहाडाचा कडा कोसळू नये, पर्यटकांसह यात्रेकरूंना इजा पोहचू नये, याकरिता पहाडाला लोखंडी जाळ्या लावल्या आहेत.
मुक्तागिरीवरील या पहिल्या डॉक्युमेंट्री फिल्ममध्ये अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचा सहकलाकार म्हणून सहभाग आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस उपायुक्त निवा जैन, अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शुभाली शहा यांच्या हस्ते डॉक्युमेंट्री फिल्मचे उद्घाटन रविवार, ७ आॅक्टोबरला मुक्तागिरी येथे होत आहे. फिल्मचे दिग्दर्शक व अँकर महेश दुबे आणि अक्ष्मा ही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
मुक्तागिरीवरील ही पहिली डॉक्युमेन्ट्री फिल्म आहे. जैन धर्म आणि तत्वज्ञानासह सिद्धक्षेत्राची माहिती येणा-या प्रत्येकाला मिळावी या उद्देशाने ही डॉक्युमेंट्री बनविण्यात आली आहे.
- अतुल कळमकर
ट्रस्टी, श्री दिगम्बर जैन सिद्धक्षेत्र, मुक्तागिरी