वृक्षारोपणात अडगाव येथे तुतीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:06+5:302021-09-02T04:27:06+5:30
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथे चक्क रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या वृक्षाची लागवडी केली जात नाही, अशा ...
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथे चक्क रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या वृक्षाची लागवडी केली जात नाही, अशा तुती वृक्षांची तब्बल दीड हजारांवर रोपे लावून यापोटी लाखो रुपयांची देयके काढल्याचा मुद्दा बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीत चांगलाच गाजला. यासंदर्भात सदस्या सुहासिनी ढेपे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल घेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उफमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) यांना दिले आहेत.
अडगाव येथे रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. जवळपास तीन हजार रोपांपैकी दीड हजारांवर रोपे तुतीची असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रोहयोतून तुती वृक्षलागवड केली जात नसताना ही लागवड कशी करण्यात आली, याचा जाब सदस्या सुहासिनी ढेपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारची संसदीय समिती जिल्हा दौऱ्यावर असताना हा गंभीर प्रकार त्यांच्याही निदर्शनास आल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. या वृक्षलागवडीसाठी मजुरांची स्वाक्षरी न घेताच लाखोंची देयके काढली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी ढेपे यांनी केली. अध्यक्षांनी सदस्याच्या मागणीची दखल घेत चौकशी आदेश दिले आहेत.
बॉक्स
निविदेच्या विषयावर वादळी चर्चा
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सहा महिन्यांपूर्वी चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील विकासकामे मंजूर आहेत. या कामांना प्रशासकीय मंजुरी असताना या कामांच्या निविदा अद्यापही उघडण्यात आल्या नसल्याचा मुद्दा माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी उपस्थित केला. यावर अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला असता, ही कामे तातडीने कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत, असे उत्तर मिळाले.