मुंबईच्या निराधार महिलेची धामणगावात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:41+5:302021-06-24T04:10:41+5:30

अमरावती : निराधार महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ ...

Mumbai's destitute woman cheated in Dhamangaon | मुंबईच्या निराधार महिलेची धामणगावात फसवणूक

मुंबईच्या निराधार महिलेची धामणगावात फसवणूक

Next

अमरावती : निराधार महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे. दत्तापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव धांदे येथील विजया सुधीर बंगाले (५४) यांचे कल्याण (मुंबई) येथे वास्तव्य आहे. २०१० मध्ये पती व २०१९ मध्ये मुलगा अपघातात गमावल्यानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या विजया बंगाले या बोरगावातील शेती विकण्यासाठी आल्या असता, सलील सच्चिदानंद काळे (३२, रा. लुणावतनगर, धामणगाव रेल्वे) याने जवळीक साधून त्यांना स्वतःच्या घरी नेले. त्यांचा विश्वास संपादन केला. विजया बंगाले यांची प्रकृती ठीक नसल्याचे पाहून तो मुंबई येथील त्यांच्या घरी राहायला गेला. डिसेंबर २०२० मध्ये त्या धामणगाव रेल्वेत सलीलच्या घरी राहू लागल्या. यादरम्यान त्याने मृत्युलेख तयार करून स्वतःला वारसदार नमूद केले. स्टेट बँकेच्या कृषी शाखेमध्ये जोडखाते काढून सलीलने स्वतःला जॉईंट होल्डर बनवून घेतले. मुंबईच्या बँकेतील ४ लक्ष ५० हजारांचे फिक्स डिपॉझिट व खात्यातील १८ लक्ष रुपये असे २२ लक्ष ५० हजार व शिल्लक ४५ हजार असे एकूण २२ लक्ष ९५ हजार भारतीय स्टेट बँकेच्या जोडखात्यात वळते केले. यानंतर त्याने विजया यांच्याशी वाद घातला. त्यामुळे कंटाळून त्यांनी मुंबई गाठली.

दरम्यानच्या काळात सलीलने विजया बंगाले यांचा विश्वास मिळवून अनेक महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. धनादेश परत न देता शिवीगाळ केली. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्याने १८ लक्ष रुपये शिल्पा कात्रे (३४, रा. अंजनगाव) नावाच्या महिलेच्या खात्यात वळते केले. इतर रक्कमसुद्धा काढून घेतल्याचा प्रकार समोर आल्याने विजया बंगाले यांनी २४ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक शिवशंकर खेडेकर यांच्या चौकशी अहवालावरून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सूरज तेलगोटे यांनी तपास केला. तपासाअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने २२ जून रोजी दत्तापूर पोलिसांनी सलील व शिल्पा यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणात कलम ४०६ ,४२० व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Mumbai's destitute woman cheated in Dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.