व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज कबूल नव्हे नाकबूल, महापालिका आयुक्त

By प्रदीप भाकरे | Published: November 7, 2022 08:56 PM2022-11-07T20:56:52+5:302022-11-07T20:57:11+5:30

उपायुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

Municipal Commissioner will not accept leave application on WhatsApp | व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज कबूल नव्हे नाकबूल, महापालिका आयुक्त

व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज कबूल नव्हे नाकबूल, महापालिका आयुक्त

Next

अमरावती: महानगरपालिकेत सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख हे रजेचे अर्ज महानगरपालिका व्हॉट्सॲप ग्रुपवर सादर करून परस्पर रजा उपभोगतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे गंभीर निरीक्षण आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी नोंदविले. परिणामी, यानंतर व्हॉट्सॲपवरील सुटीचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे आदेश आयुक्तांच्या वतीने देण्यात आले आहेत. उपायुक्तांनी ४ नोव्हेंबर रोजी तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

परिपत्रकानुसार, कोणत्याही प्रकारची रजा उपभोगण्यापूर्वी, मुख्यालय सोडण्यापूर्वी रजेचा अर्ज विहीत प्रपत्रात आवश्यक त्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह सादर करून रजा मंजूर करून घ्यावी. नंतरच रजा उपभोगण्यात यावी. (अपवादात्मक आणीबाणीची परिस्थिती वगळता) रजेचा अर्ज परस्पर सादर करून रजा उपभोगल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील प्रकरण ३ नुसार ‘हक्क म्हणून रजा मागता येत नाही,’ अशी जाणीव करून देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

काय आहे आदेश ?
काही विभाग प्रमुख/खाते प्रमुख हे सुटीच्या व रजेच्या कालावधीत परवानगी न घेता मुख्यालय सोडतात. हे कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन असून, यापुढे विभाग प्रमुख वा खाते प्रमुखांनी आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर रजेवर जाऊ नये आणि मुख्यालय सोडू नये, असे परिपत्रक उपायुक्त प्रशासन भाग्यश्री बोरेकर यांनी काढले आहे. मागील आठवड्यात एक विभागप्रमुख दोन दिवसांच्या रजेवर गेला. त्याने सुटीचा अर्ज व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. टाकताना आपल्या पदाचा तात्पुरता कार्यभार कुणाकडे राहील, याची ताजा कलमदेखील त्याने लिहिली. तीदेखील अतिशय गंभीरतेने घेण्यात आली आहे.

अनेकांनी सोडले होते मुख्यालय
मागे आयुक्त आजारी रजेवर असताना अनेकांनी ‘ऑन ड्युटी’ रजा उपभोगली. दुपारी १२ ला यायचे, दीड-दोनला निघून जायचे. त्यानंतर कुटुंब, मित्रांसमवेत गेट टूगेदर करायचे. एक-दोनजणांनी तर कार्यालयीन वेळेत जीवाचा चिखलदरादेखील केला. काहींनी केवळ दोन ते तीन तास ड्युटी केली. आयुक्त कार्यालयात येणार नाहीतच, हे जाणून असल्याने काही सन्माननीय अपवाद वगळता, साहेब आताच होते, आताच गेले, अशी गत होती. ते सर्व प्रकार आयुक्तांच्या ध्यानी आले. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या आदेशानुसार, उपायुक्तांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सूचना दिल्या.

विभाग प्रमुख वा खाते प्रमुखांनी आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर रजेवर जाऊ नये आणि मुख्यालय सोडू नये. रजेचा अर्ज विहीत नमुन्यात असावा. अर्ज मंजूर झाल्यानंतरच रजा उपभोगण्यात यावी. आयुक्तांच्या आदेशानुसार, तसे कार्यालयीन परिपत्रक काढले आहे.

Web Title: Municipal Commissioner will not accept leave application on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.