८६० घरांची निर्मिती महापालिका राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:32+5:30
केंद्र शासनाने जून २०१६ मध्ये सुरू केलेली योजना अमरावती महापालिकेत मार्च २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये चार घटकांतर्गत नागरिकांना घरांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेत घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थी मंजूर आहेत. यापैकी ११५० लाभार्थींचा प्रकल्प शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत घटक क्र. ३ मध्ये महापालिकाद्वारे ८६० घरांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थींना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे. या लाभार्थींना ३२३ चौरस फुटाचे घर बांधकामासाठी प्रतिलाभार्थी अडीच लाखांचे अनुदान देण्यात येत आहे. योजनेचे काम धडाक्यात सुरू असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांमध्ये अमरावती महापालिका राज्यात अव्वल असल्याची गौरवाची बाब आहे.
केंद्र शासनाने जून २०१६ मध्ये सुरू केलेली योजना अमरावती महापालिकेत मार्च २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये चार घटकांतर्गत नागरिकांना घरांचा लाभ मिळणार आहे. महापालिकेत घटक-४ मध्ये ५३६९ लाभार्थी मंजूर आहेत. यापैकी ११५० लाभार्थींचा प्रकल्प शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. महापालिका हद्दीमध्ये मंजूर डीपीआरमधील १२०० घरे पूर्ण करण्यात आली व काही घरकुलांचे नकाशे मंजुरी प्रक्रियेत असल्याची माहिती या योजनेचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी दिली. याव्यतिरिक्तही शासकीय जागेवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे (जानेवारी २०११ पूर्वीची) नियमानुकूल करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलेली आहे. कच्चे घरकुल असलेल्या अतिक्रमणधारकास पट्टावाटप करून घरकुलाचा लाभ देण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
महापालिका हद्दीतील गावठाण क्षेत्रामध्ये गरजू लाभार्थींना सलग तीन वर्षांच्या टॅक्स पावतीवर २० आॅक्टोबर २०१८ च्या शासनादेशान्वये घरकुलांचा लाभ देण्यात येत आहे. या परिपत्रकान्वये पीआर कार्ड सक्तीचे नाही, हे येथे उल्लेखनीय. विशेष म्हणजे, या योजनेचा प्रचार व प्रसारासाठी शेगाव व रहाटगाव परिसरात दोन वेळा शिबिरेदेखील घेण्यात आलेली आहेत. आयुक्त संजय निपाणे यांचेद्वार या योजनेचा सातत्याने आढावा घेण्यात आल्यानेदेखील योजनेची कामे गतिमान झालेली आहेत.
हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा जिल्हा आढावा घेत समाधान व्यक्त केले होते, हे येथे उल्लेखनीय.
योजनेत चार घटकांचा समावेश
पंतप्रधान आवास योजनेमध्ये चार घटकांद्वारे नागरिकांना घरांचा लाभ मिळू शकतो. यात घटक-१ मध्ये झोपडपट्टींचा आहे तिथेच पुनर्विकास करणे, घटक-२ मध्ये कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी घरे, घटक-३ मध्ये खासगी भागीदारीतून परवडणाऱ्या घरांची निर्मिती व घटक-४ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थींद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास मदत करण्यात येत आहे.
या क्षेत्रात होणार घरांची निर्मिती
महापालिका हद्दीत घटक-३ मध्ये मौजा बडनेरा, बेनोडा, निंभोरा, नवसारी, तारखेडा, म्हसला, रहाटगाव येथील भूखंडाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सदनिकेची किंमत ही साधारणपणे १० लाखांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा अंदाजे ६.५० लाखांचा राहणार आहे. २१६ सदनिकेचे बांधकाम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. ७५२ लाभार्थ्यांकडून डीडीच्या स्वरूपात ४९ हजार रुपये प्रतिअर्जदार अनामत रक्कम जमा करण्यात आल्याचे उपअभियंता सुनील चौधरी यांनी सांगितले.