महापालिकेला अलभ्य लाभ !
By admin | Published: November 14, 2016 12:06 AM2016-11-14T00:06:46+5:302016-11-14T00:06:46+5:30
नोटाबंदीच्या धक्कातंत्रामुळे सामान्यजण मेटाकुटीस आले असताना ५००-१००० च्या नोटांनी महापालिकेची बल्ले बल्ले केली आहे.
पाच कोटींची वसुली : आज मध्यरात्रीपर्यंत स्वीकारणार नोटा
अमरावती : नोटाबंदीच्या धक्कातंत्रामुळे सामान्यजण मेटाकुटीस आले असताना ५००-१००० च्या नोटांनी महापालिकेची बल्ले बल्ले केली आहे. तीन दिवसांत करापोटी महापालिकेने ५.२४ कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले आहेत. महापालिका सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत जुने चलन स्वीकारणार असल्याने करवसुलीचा आकडा सहा कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री १२ पासून ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थासह मजीप्रा, महावितरण, सिंचन पाणीपट्टीसाठी जुन्या ५०० आणि १ हजारांच्या नोटा स्वीकारार्ह राहतील, असा महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याला १४ नोव्हेंबरची मुदतवाढही देण्यात आली. कर आणि अन्य देयके भरण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. एलबीटी, मालमत्ताकर ,बाजारपरवाना शुल्क आणि बांधकाम परवानगी शुल्क ५०० आणि १ हजारांच्या जुन्या चलनात स्वीकारणार असल्याची सुवर्णसंधी महापालिकेने उपलब्ध करुन दिली. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात अनुक्रमे ३.६५ कोटी आणि ८१ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. तर रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत विविध करापोटी ७८ लाखांपेक्षा अधिकची रक्कम जमा झाली आहे.
मालमत्ता कर रेकॉर्डब्रेक
रविवारी झोन १ मधून दहा लाख रुपये, झोन २ मधून १६ लाख, झोन ३ मधून २.६५ लाख, झोन ४ मधून १५.१४ लाख तर झोन ५ मधून ३.२६ लाख रुपये मालमत्ता कर प्रप्त झाला. नव्हे तर थकबाकीदारांनी स्वत:हून भरला. याशिवाय एलबीटी मधून ३८.२७ लाख रुपये जमा झालेत. एडीटीपीच्या तिजोरीत रविवारी १८.२६ लाखांची भर पडली.