महापालिकेला अतिक्रमणाची घेराबंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 05:00 AM2022-05-11T05:00:00+5:302022-05-11T05:01:00+5:30
अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वाराला अतिक्रमणाने घेराबंदी केली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा संपूर्ण फूटपाथ व समोरील जागा अतिक्रमणधारकांनी कह्यात घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात सर्वदूर पुन्हा अतिक्रमणाने तोंड वर काढले आहे. शहरातील वर्दळीच्या चौकात अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. त्यावर कळस म्हणजे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयालाही अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाने घेराबंदी केली आहे. उपायुक्त प्रशासन सुरेश पाटील यांनी आपल्या अधिनस्थ विभागाला त्याबाबत निर्देश देऊन अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करावी, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे.
शहरातील एकही रस्ता अतिक्रमणापासून अलिप्त नाही. जागोजागी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. तक्रारी येतील तेवढीच कारवाई करण्याचा पवित्रा अतिक्रमण विभागाने घेतल्याने अतिक्रमणधारकांचे फावले आहे. अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या दोन्ही प्रवेशद्वाराला अतिक्रमणाने घेराबंदी केली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा संपूर्ण फूटपाथ व समोरील जागा अतिक्रमणधारकांनी कह्यात घेतली आहे. महापालिकेचे १५०० अधिकारी, कर्मचारी रोज त्यातूनच मार्ग काढत मुख्यालयात जात असतात. मुख्यालयासमोरील अतिक्रमण कुणालाही दिसत नाही. राजकमल चौकातील प्रवेशद्वाराजवळ फुटपाथ व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. पालिकेच्या या अग्रभागाला अनधिकृत पार्किंगने वेढले आहे. आतही चित्र काही वेगळे नाही.
अनेक विक्रेते ठाण मांडून
शाम, जयस्तंभ, राजापेठ, नवाथे, राजकमल, अंबादेवी मार्ग अशा बऱ्याच गजबजलेल्या चौकात अनेक हातगाड्या पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उभ्या आहेत. बसडेपोकडून रुक्मिणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळी अनेक हातगाड्या लागतात. त्याला कुणाचा आशीर्वाद आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे यातील काही हातगाड्यांजवळ दारू रिचविली जाते. सायंकाळी ६/७ नंतर रुक्मिणीनगरकडून बसडेपोकडे जाणारा मार्ग अघोषित आणि अनधिकृत फूड झोन बनला आहे.
रस्ते कशासाठी?
सारे फूटपाथ आणि रस्ते अतिक्रमण करणाऱ्यांसाठीच आहेत काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. फूटपाथवर खाद्यपदार्थांच्या अनेक हातगाड्या नित्यनेमाने आणि दाटीवाटीने लावल्या जातात. पार्किंगच्या जागांचा गैरवापर झाल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. गाळेधारकांनी रस्त्यावर छत घातल्याने सारे रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणाने शहराची अवस्था बकाल झाली आहे.