ऐतिहासिक खापर्डे वाड्याची केली महापालिकेने मोजणी
By admin | Published: December 3, 2015 12:09 AM2015-12-03T00:09:32+5:302015-12-03T00:09:32+5:30
श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याची महागरपालिकेने सोमवारी मोजणी केली.
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याची महागरपालिकेने सोमवारी मोजणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना तसे आदेश दिले होते. ऐतिहासिक खापर्डे वाड्याची जमीन संपादित करण्यासंदर्भात प्रस्तावाचे फाईल त्वरित मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी, असे पत्र मंत्रालयाकडून यापूर्वीच महापालिकेला प्राप्त झाले आहे.
त्यानुसार महापालिकेचे अभियंता प्रमोद इंगोले यांच्या चमूने सोमवारी खापर्डे वाड्याच्या इमारतीची इतर दुकानांची मोजणी केली. लवकरच याचा अहवाल महापालिकेद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याचे कळते. अमरावतीचे अंबानगरीचे वैभव असलेल्या खापर्डे वाड्यातून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. येथे अनेक देशभक्तांनी व संत महात्म्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे या वाड्याचे जतन व्हावे, असे निवेदन आ.रवी राणा यांनी गृहराज्यमंत्री व मुख्यमंत्र्यांना दिले होते.
खापर्डे वाड्याच्या इमारतीची मोजणी महापालिकेतर्फे करण्यात आली. या वाड्याच्या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून तसा अहवाल तयार करुन लवकरच शासनाला पाठविण्यात येणार आहे.
- चंद्रकांत गुडेवार
आयुक्त, महापालिका, अमरावती
अमरावतीचे वैभव असलेल्या खापर्डे वाड्याशी लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत. महापालिका व शासनाची पाहणी सुरू असताना ज्याने इमारत पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी. अंबानगरीचे हे वैभव जपण्यासाठी वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु.
- रवी राणा, आमदार, बडनेरा