महापालिकेचा ९२७ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:01 AM2019-02-27T01:01:34+5:302019-02-27T01:02:32+5:30

महापालिकेचे आर्थिक वर्ष २०१९-२० करिता महसूली उत्पन्नाचे स्रोत व भांडवली उत्पन्न याची सांगड घालून १६५.५५ कोटी रुपयांच्या शिलकीसह ९२७.२६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या विशेष सभेत सादर केले.

Municipal Corporation's budget of 927 crores | महापालिकेचा ९२७ कोटींचा अर्थसंकल्प

महापालिकेचा ९२७ कोटींचा अर्थसंकल्प

Next
ठळक मुद्देस्थायी समितीची विशेष सभा : ४१.२५ कोटीच्या वाढीसाठी प्रशासनाची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचे आर्थिक वर्ष २०१९-२० करिता महसूली उत्पन्नाचे स्रोत व भांडवली उत्पन्न याची सांगड घालून १६५.५५ कोटी रुपयांच्या शिलकीसह ९२७.२६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या विशेष सभेत सादर केले. यामध्ये महसुली खर्चात ४१.२५ कोटींची वाढ सुचविण्यात आली असल्याने ताळमेळ जुळविताना प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.
महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. यामध्ये आयुक्तांनी बजेट सादर केले. सन २०१९-२० या वर्षात प्रारंभिक शिल्लक १७४.७७ कोटी आहे. यामध्ये महसुली शिल्लक ३७.१६ कोटी, भांडवली शिल्लक १३०.७१ कोटी व सर्व बाजूंनी येणारे उत्पन्न ७५२.५० कोटी आहे. महसुली उत्पन्न २७४.४७ कोटी, भांडवली उत्पन्न ४६८.०६ कोटी व निलंबन उत्पन्न ९.९७ कोटींचे आहे. भांडवली खर्चासाठी प्रारंभिक शिल्लक १३०.७१ कोटी व भांडवली उत्पन्न ४६८.०६ कोटी अशा एकूण ५९८.७७ कोटींच्या प्राप्त विनियोगातून शासनाच्या अटी-शर्तीनुसार खर्च करावा लागणार आहे.
महापालिकेकडील प्रारंभिक महसुली शिल्लक ३७.१६ कोटी व महसुली उत्पन्न २७४.४७ कोटी असे एकूण ३११.६३ कोटींचा विनियोग महसुली खर्चासाठी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले.
यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण खर्च ७६१.७२ कोटी एवढा आहे. यामध्ये महसुली खर्च ३१०.५७ कोटी, भांडवली खर्च ४४१.४६ कोटी व निलंबन खर्च ९.६९ चा समावेश आहे. या वर्षाअखेर महसुली शिल्लक १.०७ कोटी, भांडवलीअखेरची शिल्लक १५७.३१ कोटी व निलंबनअखेरची शिल्लक ७.१७ कोटी असे एकूण १६५.५५ कोटी रुपये शिल्लक राहणार आहेत.

या आहेत विशेष तरतुदी
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा व त्यासाठी चबुतरा याकरिता १.२५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
विशेष प्रवीण्यप्राप्त व सर्वसाधारण कुटुंबातील खेळाडूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी १० लाखांची नवीन शीर्ष उघडून विशेष तरतूद.
शहरातील मृत लहान जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी २५ लाखांंच्या शवदाहिनीसाठी विशेष तरतूद.
महापालिका कर्मचारी वैद्यकीय साहाय्यासाठी ५० लाख. नवीन अग्निशमन गाडी खरेदीसाठी १ कोटींची विशेष तरतुद
शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई, सौदर्यीकरणासाठी विशेष तरतूद केल्याचे सभापती विवेक कलोती यांनी सांगितले.

स्वनिधीसाठी कर्जउभारणी नाही
यंदाच्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नवाढीसाठी कर्जउभारणी करण्यात येणार नाही. त्याऐवजी नव्या मालमत्ता शोधून मालमत्ताकरात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी प्रीमियम चार्जमध्ये १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर अशी करवाढ करण्यात आली. त्याद्वारे उत्पन्न ३२ कोटींवरून ४५ कोटी अपेक्षित आहे.
जलपुनर्भरण कार्यक्रमासाठी गतवर्षीच्या तुलनेत चारपट म्हणजेच एक कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. अपरंपरागक ऊर्जास्रोतांसाठी २.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संगणकीकरण अत्यावश्यक असल्याने त्यासाठी १.७५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आस्थापना वगळून अनावश्यक खर्चात कपात करण्यात येणार आहे.

अशी झाली बजेटमध्ये ४१ कोटींची वाढ
४वॉर्ड विकासासाठी व स्वेच्छानिधीसाठी प्रत्येकी १५.९० लाख, उद्यानविकाससाठी २५ लाख, रस्ते खोदकाम ५ कोटी, रस्ते खोदकामासाठी ५ कोटी, महापौर क्रीडा चषकासाठी ५ लाख, रस्ते डांबरीकरणासाठी २.५० कोटी, आऊटस्कड एरियासाठी २.५० कोटी, झोपडपट्टी मागास भाग विकासासाठी १ कोटी, परकोटाच्या आतल्या विकासासाठी ५० लाख असे एकूण ४१.२५ कोटींची वाढ स्थायीच्या बैठकीत सुचविण्यात आली.

Web Title: Municipal Corporation's budget of 927 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.