महापालिकेच्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना आवरा!
By admin | Published: April 19, 2016 12:03 AM2016-04-19T00:03:46+5:302016-04-19T00:03:46+5:30
अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे सौजन्य नसलेल्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी विनंती सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
सहायक आयुक्तांची आयुक्तांकडे धाव : महापौरांच्या दालनाबाहेर वाद
अमरावती : अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, कसे वागावे याचे सौजन्य नसलेल्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी विनंती सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
महापालिकेतील पाचही सहायक आयुक्तांनी सोमवारी दुपारी या प्रकाराबाबत प्रशासनाकडे सांघिक तक्रार केली. त्यामुळे कार्यालयात परतल्यानंतर आयुक्त शिक्षणाधिकाऱ्यांवर कुठली ‘अॅक्शन’ घेतात, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बुधवार २० एप्रिलला होणाऱ्या आमसभेपूर्वी सोमवारी दुपारी महापौरांच्या कक्षात पूर्व बैठक घेण्यात आली. यात एका गोपनिय पत्राच्या अनुषंगाने मनपाचे शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने यांनी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांना जाब विचारला. आपण कुठल्या अधिकारान्वये मला पत्र लिहिले? मला कुणीही पत्र लिहू शकत नाही, असा पवित्रा गुल्हाने यांनी घेतला. मात्र त्या पत्रात कुठलेही आदेश नव्हते. ते विनंतीपत्र आहे, असे वानखडे यांच्यासह अन्य सहाय्यक आयुक्तांनी सांगितले. तथापी गुल्हाने ऐकायला तयार नव्हते. गटनेते आणि महापौरांच्या उपस्थितीत गुल्हाने सहायक आयुक्तांवर चिडले. बैठक संपल्यानंतर सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, महेश देशमुख, योगेश पिठे, प्रणाली घोंगे आणि प्रवीण गुल्हाने यांनी विजय गुल्हानेंना जाब विचारला. महापौरांच्या कक्षात गुल्हानेंना कुठलेही प्रत्युत्तर न देता दालनाबाहेर सहायक आयुक्त व विजय गुल्हानेंमध्ये वाकयुद्ध रंगले. गुल्हाने यांनी आपला अपमान केला असून त्यांना समज द्यावी, असे विनंती पत्र या सहायक आयुक्तांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात दिले. (प्रतिनिधी)
उपायुक्तांनाही विचारला उलट प्रश्न
१५ दिवसांपूर्वी शिक्षणाधिकारी गुल्हाने यांनी उपायुक्त चंदन पाटील यांना उलट प्रश्न विचारला होता. १० हजार रुपये अग्रीम कशाला हवाय? प्रश्नपत्रिका पोहोचविण्याचे नियोजन काय? अशी विचारणा पाटील यांनी गुल्हानेंना केली होती. त्यावर पत्र लिहून ‘नियोजन सांगण्याची गरजच आहे का?’ असा प्रश्न गुल्हानेंनी उपस्थित केला होता. अर्थात माहिती देणे आवश्यकच आहे का? असे गुल्हाने यांनी उपायुक्त पाटील यांना विचारले होते. पाचवी ते आठवीच्या प्रश्नपत्रिका भातकुली पंचायत समितीमधून १४ गटसाधन केंद्रावर पोहोचवायच्या होत्या. त्यासाठी गुल्हानेंनी १० हजार अग्रीम मागितले होते. मात्र त्या प्रश्नपत्रिका केव्हा आणि कशाने पोहोचविणार आहात या नियोजनाची माहिती पाटील यांनी गुल्हानेंना मागितली होती. त्यावर नियोजनाची रुपरेखा न देता आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला उलट प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य गुल्हानेंनी केले होते.
वादग्रस्त गुल्हाने!
कंत्राटी तत्त्वावर महापालिकेत सेवा देणारे गुल्हाने अल्पकाळातच वादग्रस्त बनले आहेत. याआधी त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना पत्र लिहून महापालिकेच्या शाळांत विनापरवानगी कुणीही येऊ नये, मनपा शिक्षण विभागाला पूर्वसूचना देण्यात यावी, असे निर्देशच दिले होते. त्या पत्रावर बराच वाद झाला होता. डायट प्राचार्यांना कंत्राटी शिक्षणाधिकारी पत्र लिहून जाब विचारू शकतो काय, असा प्रश्न त्यावेळी चर्चिला गेला होता. त्यावर महापालिकेच्या कंत्राटी शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर न देता डायट प्राचार्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मार्गदर्शन मागवले होते.
एका गोपनीय पत्रानुसार शिक्षण विभागासह अन्य विभागप्रमुखांना खबरदारी पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात अधिकाराचा गैरवापर कुठे? गुल्हानेंनी मात्र आम्हा सर्वांचा अपमान केला. तशी तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली.
- नरेंद्र वानखडे,
सहाय्यक आयुक्त, मनपा
माझ्या दालनात वाद झाला नाही; तथापि दालनाबाहेर सहाय्यक आयुक्तांनी गुल्हानेंना जाब विचारल्याची माहिती आहे.
- चरणजित कौर नंदा, महापौर
महापौरांच्या दालनात काहीही झाले नाही. मला माहीत नाही. मी कुणाला काहीही बोललो नाही.
- विजय गुल्हाने,
शिक्षणाधिकारी, मनपा