महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचा ‘निद्रिस्त हत्ती’ हलला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:53+5:302021-09-03T04:13:53+5:30
उपायुक्तांकडून हॉटेल, लॉजची पाहणी : फायर ऑडिटसाठी १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ अमरावती : राजापेठ स्थित हॉटेल इम्पेरियाला लागलेल्या आगीत नागपूरकराला ...
उपायुक्तांकडून हॉटेल, लॉजची पाहणी : फायर ऑडिटसाठी १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’
अमरावती : राजापेठ स्थित हॉटेल इम्पेरियाला लागलेल्या आगीत नागपूरकराला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर निद्राधीन असलेला महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला जाग आली. फायर ऑडिटच्या मुद्द्याने जागे झालेल्या अग्निशमन विभागाला सोबत घेऊन उपायुक्तांनी अनेक हॉटेलची पाहणी केली. नाहरकत तपासत फायर ऑडिट करवून घेण्यासाठी हॉटेल संचालकांना १५ दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला.
‘शहरातील लॉज, हॉटेल....ही तर मृत्यूची अंधारकोठडीच!’ या वृत्तातून ‘लोकमत’ने शहरातील हॉटेल, लॉजने फायर ऑडिटला कसा ठेंगा दाखविला, यावर कटाक्ष रोखला. त्याची दखल घेत, गुरुवारी महापालिकेचे उपायुक्त सुरेश पाटील यांनी अग्निशमन विभागाचे फायरमन संतोष केंद्रे, गौरव दंदे, अमित ददगाळ व जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर यांच्यासमवेत राजापेठ-बडनेरा मार्गातील काही हॉटेलमध्ये जाऊन अग्निरोधक यंत्रणेविषयी पाहणी केली. फायर ऑडिट करून घ्यावे, त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत अग्निशमन विभागाकडे द्यावा, असे निर्देश दिले. सोबतच सामान्य एक्झिटसह इमरजंसी एक्झिट तीही रुंद अशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हॉटेल इम्पेरियाकडे २०१८ चे फायर ऑडिट आढळून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
घटनेनंतरच जाग का?
२४ मे २०१९ रोजी सुरत येथील एका चारमजली इमारतीतील कोचिंग क्लासला आग लागली होती. त्यात २३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने अमरावती महापालिकेने शहरातील कोचिंग क्लासेेसला फायर ऑडिट बंधनकारक केले. त्यानंतर १६ कोचिंग क्लासने ते करवून घेतल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला. मात्र, उर्वरित कोचिंग क्लासचे ऑडिट केव्हा, याचे उत्तर त्या विभागाकडे नाही. आताही एकाचा बळी गेल्यानंतर फायर ऑडिट करून घ्या रे बाबांनो, अशी आर्त हाक देण्यात आली आहे.
//////
नोटीसचा बागुलबुवा?
फायर ऑडिट न केलेल्या हॉटेल, लॉजना नोटीस देण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, घटनेनंतरच नोटीस देण्याची जाग का आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ठक्कर यांचा मृत्यू विस्मरणात गेला की, नोटीसही धूळखात पडतील. पुन्हा एखादी घटना घडली, की फायर ऑडिट ‘बळेबळे’ बंधनकारक करण्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
///////////
राजापेठ पोलिसांनी मागितली माहिती
हॉटेल इम्पेरियाचे फायर ऑडिट झाले का, हॉटेलमध्ये नेमकी कशी अग्निरोधक यंत्रणा हवी होती, बांधकाम परवानगी व नकाशामध्ये नेमके काय अंतर्भूत आहे, याबाबतची संपूर्ण माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी महापालिकेला मागितली आहे.