महापालिकांना आता १३५ लिटर दरडोई पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:48 PM2018-01-28T22:48:09+5:302018-01-28T22:48:34+5:30

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर जाहीर केले आहेत. पाण्याच्या दरात सात वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे.

Municipal corporations now have 135 liters per capita water | महापालिकांना आता १३५ लिटर दरडोई पाणी

महापालिकांना आता १३५ लिटर दरडोई पाणी

Next
ठळक मुद्देपाणीपट्टीत होणार वाढ : १ फेब्रुवारीपासून नवे दर

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर जाहीर केले आहेत. पाण्याच्या दरात सात वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा फटका पाणीपट्टी भरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वसामान्य नळधारकांना सोसावा लागणार आहे. ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. ११ जानेवारीला याबाबत विस्तृत आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जाहीर केला. नव्या धोरणानुसार महापालिकांना दरडोई १३५ लिटर पाणी मिळेल.
यापूर्वी प्राधिकरणाने ३० मे २०११ रोजीच्या आदेशाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी क्षेत्रातील पाणी वापरासाठीचे ठोक जलदर निश्चित केले होते. हे दर रबी हंगाम २०१०-११ पासून म्हणजेच १५ आॅक्टोबर २०१० पासून लागू करण्यात आले होते. यानंतर पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. दरम्यानच्या काळात महागाई निर्देशांकामध्ये ६३ टक्क्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने जलदर निश्चित करण्यात आलेत. नव्या जलदरानुसार ग्रामपंचायतींसाठी प्रति हजार लिटरमागे १३.२ पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशांवरून २५ पैसे इतकी दरवाढ करण्यात आली आहे. शीतपेये, ब्रेवरी (आसावणी), मिनरल वॉटरसह अन्य औद्योगिक वापरांसाठी १६ रूपयांवरून १२० रुपये अशी सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. नव्या जलदरानुसार थकीत पाणीपट्टीवर दर साल दर शेकडा १० टक्के दराने दंड आकारणी करण्याचे निर्देश महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत.
महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नव्याने ठरविलेल्या पाणीवाटप धोरणानुसार आता ५० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांना दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठ्याची मर्यादा आखून दिली आहे. ग्रामपंचायतींना ५५ लिटर, ‘क’ वर्ग नगरपालिका व नगरपंचायतींना ७० लिटर, ‘ब’ वर्ग नगरपालिकांना १०० लिटर, ‘अ’ वर्ग नगरपालिकांना १२५ लिटर, तर ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांना १५० लिटर दरडोई पाणी वापर करता येईल.
पाणीवाटप संस्थेला २५ टक्के सवलत
शेतकऱ्यांनी पाणीवाटप संस्था स्थापन केल्यास, त्यांना २५ टक्के सूट मिळणार आहे. कृषी उद्योगासह सूक्ष्म सिंचनासाठी पाणीदरात २५ टक्के प्रोत्साहन सवलत मिळणार आहे. शेती व घरगुती वापराच्या पाणीपट्टी दरात १७ टक्यांनी वाढ करण्यात आली. औद्योगिक वापरासाठीच्या पाणीदरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: Municipal corporations now have 135 liters per capita water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.