महापालिकेची आमसभा तहकूब
By admin | Published: June 19, 2016 12:09 AM2016-06-19T00:09:17+5:302016-06-19T00:09:17+5:30
माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत शनिवारी आमसभा तहकूब करण्यात आली.
डहाकेंप्रती शोकसंवेदना : सर्वपक्षीयांची श्रद्धांजली
अमरावती : माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत शनिवारी आमसभा तहकूब करण्यात आली. ही आमसभा आता २३ जून रोजी घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता आमसभेला सुरुवात झाली. बांधकाम विभागाशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले यांनी दिगंबर डहाके यांच्या निधनाप्रती तीव्र शोक व्यक्त करीत शोक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनुमोदन दिले. दिगंबर डहाके हे चौथ्यांदा महापालिकेत प्रतिनिधीत्व करीत असताना या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वावर काळाने झडप घातली. जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होती, अशा शब्दांत राकाँ फ्रंटचे गटनेते चेतन पवार यांच्यासह स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, प्रदीप बाजड, राजेंद्र तायडे, नीलिमा काळे, सुजाता झाडे, तुषार भारतीय, गुंफा मेश्राम, अजय गोंडाणे, मिलिंद बांबल, चंदुमल बिल्दानी, जयश्री मोरे, कांचन ग्रेसपुंजे, प्रकाश बन्सोड, विजय नागपूरे, सुनील काळे, प्रदीप दंदे, अ. रफिक, वनिता तायडे आदींनी डहाकेंप्रती संवेदना व्यक्त केल्या. डहाकेंच्या निधनाने स्पष्टवक्ता, निडर, निर्भय असा ज्येष्ठ सहकारी आणि उमद्या नेतृत्वाला अमरावतीकर मुकल्याची भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली. दोन महिन्यांपूर्वी आमसभेत त्यांनी केलेल्या शाब्दिक फटकेबाजीलाही अनेक नगरसेवकांनी उजाळा दिला. तत्कालीन आयुक्तांबरोबर आमसभेत त्यांची चांगलीच जुगलबंदी झाली होती, अशी आठवण काढत मर्दांच्या शहरातून मर्द निघून गेलाय, अशा भावना व्यक्त करण्यात आल्यात. आक्रमक आणि लढवय्या असलेल्या डहाकेंच्या निधनाची बातमी ‘शॉकिंग न्युज’ होती. डहाके असे अर्ध्यावरच जातील, अशी कल्पनाही न करवत असल्याने अनेकांकडून खात्री केली व त्यानंतर धक्काच बसला, अशी संवेदना महापौर रिना नंदा यांनी व्यक्त केली व त्यानंतर आमसभा तहकूब करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)