महापालिका निवडणूक होणार प्रभाग पद्धतीने
By admin | Published: January 18, 2016 12:11 AM2016-01-18T00:11:01+5:302016-01-18T00:11:01+5:30
सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका दोन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिणीस रामदास आंबटकर यांनी येथे रविवारी दिली.
संवाद : भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांची माहिती
अमरावती : सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका दोन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिणीस रामदास आंबटकर यांनी येथे रविवारी दिली.
भाजप कार्यालयात पार पडलेल्या भाजपा अध्यक्षपदाचीनिवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंबटकर यांच्या मते, भाजपच्या वरिष्ठांचे महापालिका निवडणूक प्रभागपद्धतीने घेण्याबाबत एकमत केले आहे. प्रभाग पद्धतीची निवडणूक दोन किंवा चार सदस्यीय प्रणालीने घ्यावी, हे वॉर्ड रचनेनुसार ठरविले जाईल. मात्र, नगरपरिषदांच्या निवडणुकादेखील प्रभाग पद्धतीने होतील. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जातील. परंतु महापालिका निवडणुकीत थेट जनतेतून महापौर निवडण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे देखील त्यांनी मान्य केले.
प्रभागपद्धतीने पक्षात बंडाळी, अंतर्गत हेवेदाव्यांना पूर्णविराम तर अपक्षांना फार वाव मिळत नाही, त्यामुळेच भाजपने महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणपणे महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होतील.
प्रभाग पद्धतीेने राजकीय पक्षाला वाव मिळत असून पक्षाचे ध्येय, धोरण लागू करता येते हे यापूर्वी झालेल्या प्रभागपद्धती निवडणुकीचा दाखला देताना त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत महापालिकेत राजकीय पक्षाचे वर्चस्व राहात असून अपक्ष सदस्यांच्या दबावतंत्र वापरण्याच्या खेळीला लगाम मिळतो, ही बाब सुद्धा आंबटकर यांनी बोलून दाखविली. महापालिका लोकसंख्येच्या आधारावर दोन किंवा चार सदस्यीय प्रभाग प्रणालीची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार, असे रामदास आंबटकर म्हणाले.